उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला – जे.पी. नड्डा
Featured

उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला – जे.पी. नड्डा

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – महाराष्ट्रात आम्हीच निवडणूक जिंकलो होतो. मात्र सत्तेसाठी आमचा विश्वासघात करण्यात आला. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेससोबत तुम्ही निवडणूक जिंकता, मात्र जे राज्यांमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जिंकताना कष्ट घ्यावे लागतात. त्यावर ते म्हणाले महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तर आमच्यासोबतच निवडणूक लढले होते. महाराष्ट्रात आम्ही हरलो नाही. महाराष्ट्रात आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. सत्तेसाठी भाजपाचा विश्वासघात करण्यात आला. महाराष्ट्रात आम्ही निवडणूक जिंकलो होतो. फडणवीस मुख्यमंत्री होतील असाच जनमताचा कौल होता असं नड्डा यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 105 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र अडीच-अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद यावरुन दोन्ही पक्षांचं घोडं अडलं. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद सर्वश्रुत आहे. तसंच या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी काडीमोड घेतला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी तयार होऊन महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणूक निकाल लागल्यापासून काय काय घडलं ते महाराष्ट्राला ठाऊक आहेच. भाजपा आणि शिवसेना यांनी निवडणूक एकत्र लढली. मात्र निवडणूक निकालानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या.

Deshdoot
www.deshdoot.com