सार्वमत
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-7 समुहात भारतासह चीनविरोधी देशांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या संभाव्य प्रवेशावरून चीनचा प्रचंड जळफळाट सुरू झाला असून भारताने आगीशी खेळू नये अशी धमकी चीनने पुन्हा दिली आहे. यापूर्वी भारताने अमेरिका-चीन वादात पडू नये अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी चीनने दिली होती.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखात भारतासाठी हे पाऊल नुकसानदायक असणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत, रशियासह अन्य काही देशांना जी-7 समुहात सहभागी करून जी-10, जी-11 बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रस्तावामुळे विकसित देशांचा फायदा होणार असला तरी भारताचे नुकसान होणार असल्याचा स्पष्ट इशारा चीनने दिला आहे.
ग्लोबल टाईम्समधील लेखानुसार, भारतात सध्या असलेल्या सरकारला सत्तेच्या ताकदीची भूक लागली आहे. त्यामुळे त्यांना ट्रम्प यांचा डाव लक्षात येत नाही. सीमाप्रश्नात स्वत:ला बलशाली दाखवण्यासाठी भारत आता जी-7 आणि अमेरिकेची मदत घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आशियात चीन अधिक शक्तिशाली होत असल्यामुळे चीनविरोधात एक मोहीम सुरू झाली असल्याचे चीनने म्हटले आहे.
मैत्रीपूर्ण संबंधानंतरही भारत चीनला आपला शत्रू मानत आहे. त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर होत असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनविरोधात अमेरिकेला मदत केल्यास भारताला हे महागात पडणार आहे. अमेरिका-चीन शीतयुद्धात भारताने सहभागी होणे टाळले पाहिजे. भारत सहभागी झाल्यास त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसू शकतो, अशी धमकी चीनने दिली आहे.