देशात 8 हजार 324 करोना रुग्ण पूर्णपणे बरे – आरोग्य मंत्रालय
Featured

देशात 8 हजार 324 करोना रुग्ण पूर्णपणे बरे – आरोग्य मंत्रालय

Dhananjay Shinde

सार्वमत

रुग्ण बरे होण्याचा दर 25 टक्क्यांपेक्षा जास्त, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 11 दिवसांवर
नवी दिल्ली – भारतात आतापर्यंत 8 हजार 324 करोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 25.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे रुग्ण दुप्पट होण्याचा वेगही आता 11 दिवसांवर गेला असून ही देशासाठी आश्वासक स्थिती आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी करोनाविषयक दैनंदिन पत्रकारपरिषदेत गुरूवारी सांगितले.

देशात आतापर्यंत एकुण 8 हजार 324 करोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 25.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातल एकुण करोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 050 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 1718 नवे करोनाबाधित आढळले आहेत, 630 रुग्ण बरे झाले आहेत आणि 67 मृत्यू झाले आहेत. देशाता आतापर्यंत एकुण 1074 मृत्यू झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत झालेली वाढ हे सकारात्मक लक्षण असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

देशात करोनाग्रस्तांचा मत्यूदर हा 3.2 टक्के असून त्यात 65 टक्के पुरुष आणि 35 टक्के महिलांचा समावेश आहे. वयोमानानुसार पाहिल्यास वय वर्षे 45 पेक्षा कमी वयोगटात म़ृत्यूची टक्केवारी 14 टक्के, वयवर्षे 45 ते 60 दरम्यान 34.8 टक्के, वयवर्षे 60च्या पुढे 51.2 टक्के अशी आहे. त्याचप्रमाणे वयवर्षे 60 ते 75 च्या दरम्यान 42 टक्के, तर वयवर्षे 75 त्या पुढे मृत्यूदर हा 9.2 टक्के आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या 78 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णांचे वय जास्त होते आणि त्यांना अन्य आजारही होते, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.

रुग्ण दुप्पट होण्याचा देशाचा सरासरी वेग हा आता 11 दिवसांवर गेला असून हा देखील सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये वेग त्याहूनही जास्त आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, तामिळनाडू, ओदिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा दर 11 ते 20 दिवसांच्या दरम्यान आहे. कर्नाटक, लडाख, उत्तराखंड, हरियाणा आणि केरळचा दर 20 ते 40 दिवसांवर गेला आहे. त्याचप्रमाणे आसाम, तेलंगाणा, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये 40 दिवसांपेक्षा जास्त दुपटीचा वेग आहे. आगामी काळात दुपटीचा वेग वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे असेही ते म्हणाले.

लस संशोधन सुरु – करोनाविरोधात औषध अथवा लसीबाबत विविध संस्था संशोधन करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसोबत भारतदेखील काम करीत आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही कालावधी लागणे अपेक्षित आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com