राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेचे शाही उद्घाटन
Featured

राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेचे शाही उद्घाटन

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे या स्पर्धा यशस्वी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली.

क्रीडा व युवा सेवा संचनालय, जिल्हा क्रीडा परिषद व अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 7 जानेवारीपर्यंत चालणार्‍या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्धघाटन वाडिया पार्क मैदानावर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, स्कूल गेम फेडरेशनचे संचालक अजय मिश्रा, बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, क्रीडा अधिकारी व स्पर्धा संयोजक कविता नावंदे, स्पर्धेचे चीफ रेफरी नरेंद्र नावर्देकर, राष्ट्रीय खेळाडू मिलिंद कुलकर्णी, आय लव्ह नगरचे प्रतिनिधी संदीप जोशी, जागरुक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, सामाजिक कार्यकर्ते धनेश बोगावत, रावसाहेब घाडगे, महिला बाल कल्याण सभापती लता शेळके, नगरसेवक रविंद्र बारस्कर आदींसह देशातून आलेल्या 65 राज्यांचे प्रशिक्षक सुमारे सहाशे खेळाडू, संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा नगरमध्ये झाल्याने शहरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होणार असल्याने खेळाडूंनी प्राविण्य दाखवून आपआपल्या राज्याचे नाव उंचवावे. यावेळी अजय मिश्रा, कविता नावंदे यांची भाषणे झाली. यावेळी विविध लोकनृत्य सादर करण्यात आले.

पहिल्या सत्रातील विजेते
पहिल्या सत्रात झालेल्या सामन्यात विजयी संघ असे. केंद्रीय विद्यालय विरुद्ध पश्चिम बंगाल (विजयी), कर्नाटक विरुद्ध तेलंगना (विजयी), हरियाना (विजयी) विरुद्ध विद्या भारती, तामिळनाडू (विजयी) विरुद्ध आसाम, मध्यप्रदेश (विजयी) विरुद्ध पंजाबी, महाराष्ट्र (विजयी) विरुद्ध आंध्रप्रदेश, दिल्ली विरुद्ध बिहार (विजयी), ओरिसा विरुद्ध आयबीएसओ संघ (विजयी), दिव-दमण विरुद्ध छत्तीसगड (विजयी), जम्मू काश्मिर विरुद्ध गुजरात (विजयी), पाँडेचरी (विजयी) विरुद्ध सीबीएससी स्पोर्ट संघ, छत्तीसगड विरुद्ध हिमाचल प्रदेश (विजयी), झारखंड (विजयी) विरुद्ध गोवा.

Deshdoot
www.deshdoot.com