पालकमंत्र्यांसमोरच खा. लोखंडे, पाचपुतेंकडून पोलीस, महसूलचा पंचनामा
Featured

पालकमंत्र्यांसमोरच खा. लोखंडे, पाचपुतेंकडून पोलीस, महसूलचा पंचनामा

Dhananjay Shinde

हप्ते घेऊन वाळूतस्करीसोबतच खुलेआम गुटखा विक्री

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने खुलेआम वाळूतस्करी आणि गुटखा विक्री सुरू आहे. वाळूतस्करांच्या नक्षलवाद्यांपेक्षा मोठ्या संघटना तयार झाल्या आहेत. वाळूतस्कारांना पोलीस हप्ते घेऊन सोडून देतात. अशी परिस्थिती गुटखा विक्रीचीही आहे, यामुळे जिल्ह्यातील तरूणपिढी संपून जाईल अशी भिती आ. बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केली. तर खा. सदाशिव लोखंडे यांनी पोलीस आणि महसूल विभाग एकत्र येऊन वाळूतस्करी करत असल्याचा गंभीर आरोप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर केला. त्यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी गंभीर असल्याची टिप्पणी करत चिंता व्यक्त केली.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची सभागृहात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किशवे उपस्थित होते.

याशिवाय सभागृहात आ. सुधीर तांबे, आ. पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. लहू कानडे यांची बैठकीस उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी चालू वर्षीचा खर्चाची आकडेवारी सादर करत यंदा देखील जिल्हा नियोजनचा शंभर टक्के निधी खर्च होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत आ. पाचपुते यांनी जिल्ह्यातील रस्ते दुरूस्तीवर करण्यात आलेला खर्च आणि सद्यस्थितीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. तसेच रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे सांगत एका दिवसांत सहा किलो मीटर रस्त्याची दुरूस्ती करण्यात येत असल्याचा आरोप केला. आ. काळे यांनी अनेक गावांचे गावठाण संपले असून सरकारने नव्याने गावठाणी निर्मिती करावीत, अशी मागणी केली. तसेच कोपरगाव शहराला आधी 23 दिवसांनी मग 16 दिवसांनी आणि आता 9 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच साठवण तलावासाठी तातडीने निधीची मागणी केली.

या विषयावर पालकमंत्री मुश्रीफ गंभीर होत हा प्रकार चुकीचा आहे. कोपरगाव शहराची लोकसंख्या विचारली. त्यावर आ. काळे यांनी एक लाख सांगताच तातडीने उपाययोजनेचे आश्‍वासन दिले. त्यानंतर आ. काळे यांनी गौणखनिज विभागाच्या निधीचा विषय उपस्थित केला. आ. कानडे यांनी राहुरी तालुक्यातील मुसळवाडी तलावाच्या विषयाला गती मिळावी आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत निधीची मिळावा, अशी मागणी केली. आ. तांबे यांनी अवकाळीग्रस्तांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, तिर्थक्षेत्र विकासच्या कामा असमानता असून संगमनेर- घोटी मार्गाच्या दुरावस्थेचा विषय उपस्थित केला. तसेच जिल्ह्यात नागरी वस्त्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून यामुळे नागरिक भयभित असल्याचे सांगितले. या विषयावर खा. लोखंडे, आ. पाचपुते आक्रमक होते. यासह शाळाखोल्यांचा विषय, गॅस जोड नसणार्‍यांना रॉकेल मिळणे आवश्यक असल्याच्या विषयावर चर्चा झाली. पुणतांबे गावात काळविटांचा त्रास असून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आ. काळे यांनी केली. तसेच शिवार मोजणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाणी योजनासाठी सौर योजना राबविल्यास यातून नागरिकांना मोफत पाणी पुरवठा करता येईल, तसेच ग्रामीण भागात विजेच्या डिपीचा गंभीर असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून तरतूद करावी, अशी आग्रही मागणी खा. डॉ. विखे यांनी केली.

जिल्ह्यात शेडनेट अनुदानाचा गंभीर विषय असल्याचे खा. लोखंडे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन शंभर कोटी अधिकचा निधी आपण मिळवला आहे. नगर शहरातील ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन व संरक्षण, नवे विश्रामगृह, शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधी, रस्ते विकास आदींसाठी आपण निधी उपयोगात आणत आहोत. त्याचबरोबर महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत 2 लाख 58 हजार 787 इतक्या सर्वाधीक शेतकर्‍यांना लाभ देणारा आपला जिल्हा असणार आहे. कर्जमुक्तीची ही रक्कम 2296 कोटी 54 लाख इतकी असणार आहे. विहीत मुदतीत आधार प्रमाणीकरण करण्यात येईल. अहमदनगर जिल्हयातील ब्राम्हणी (ता. राहुरी)आणि जखणगांव (ता. नगर) या दोन गावांतील विविध कार्यकारी सेवा संस्थांची यासाठी निवड झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील जे प्रश्न राज्य स्तरावरील आहेत, त्यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना घेऊन मुंबईत संबंधित मंत्रीमहोदयांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

मांगूर माश्यावर बंदी घाला
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मांगूर माश्याची विक्री सुरू आहे. हा मासा खाल्यास त्यामुळे जीवेघेणे आजार होत आहेत. त्यावर मत्सविभागाच्या अधिकार्‍यांनी यासह दुजोरा दिल्यानंतर या माशाच्या विक्रीवर जिल्ह्यात बंदी घालण्याची मागणी आ. पाचपुते यांनी केली.

बिबट्या अन् हास्यांचे फवारे
बैठकीत बिबट्या मानवी वस्त्यांमधील वावराचा विषय निघताच पुन्हा खासदार लोखंडे आक्रमक झाले. काहीही करा, पण बिबट्याचा बंदोबस्त करा, एकदा एका भागात पकडलेला बिबट्या पुन्हा त्याच भागात येतो. यामुळे बिबट्याला परराज्यात नेवून सोडा, अशी मागणी करताच खसखस पिकली. त्यावर आ. पाचपुते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी बिबट्या माझ्या घराजवळ आला होता. त्यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी मिश्कीलपणे तुम्ही माजी वनमंत्री असल्याने बिबट्या आला असल्याचे सांगताच पुन्हा हश्या झाला. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी वन कायद्यामुळे बिबट्याला पकडून सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com