मुरूम, माती खाणार्‍यांना साडेसहा कोटींचा दणका!

मुरूम, माती खाणार्‍यांना साडेसहा  कोटींचा दणका!

बेकायदेशीर उत्खनन : संगमनेर तहसीलदारांनी ठोठावला दंड

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निमज शिवारातील स्वातंत्र्य सैनिकास महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या जमिनीतून बेकायदेशीररित्या मुरुम व मातीचे उत्खनन करणार्‍या तिघांविरुध्द तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई केली आहे. 6 कोटी 66 लाख 96 हजार 590 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून जप्त केलेल्या वाहनाला 2 लाख 22 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दैनिक सार्वमतने ‘मुरुम व मातीचे बेकायदेशीर उत्खनन‘ हे वृत्त प्रकाशित करून प्रकरण समोर आणले होते. राज्याच्या महसूल मंत्र्यांकडेच या प्रकरणाची तक्रार झाली. त्यामुळे या प्रकरणी आस्तेकदम चालणार्‍या महसूल विभागातही हलचल झाली होती.

निमज येथील गट नंबर 35/6 व 35/7 मधील मुरुम व मातीचे बेकायदेशीररित्या सुमारे 2500 ते 3000 ब्रास चे उत्खनन शरद बाळू लष्करे, विनोद बाळू लष्करे, बाळू लालू लष्करे यांनी करुन त्याची विक्री करत असल्याची तक्रार भागीरथीबाई मधुकर लोणारी यांनी केली होती. या तक्रारीनंतर महसूल प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी मंडलाधिकारी व तलाठी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर मंडलाधिकारी व तलाठी यांना सदर ठिकाणी गौण खनिजाची वाहतूक अनाधिकृत होत असल्याचे दिसून आले. त्यानुसार सदर ठिकाणी विना परवाना मुरुम वाहतूक करणारा ढंपर एम. एच. 05-9135 हे वाहन व त्यामधील 2 ब्रास मुरुम महसूल अधिकार्‍यांनी जप्त केला. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) व (8) नुसार दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्याची नोटीस संबंधीतांना बजावण्यात आली. त्यामध्ये 2 लाख 22 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर गट नंबर 35/6 व 35/7 मधून आतापर्यंत एकूण 6 हजार 757 ब्रास अनाधिकृतपणे मुरुम व मातीचे उत्खनन झालेबाबतचा अहवाल व पंचनामा मंडलाधिकारी व तलाठी यांनी तहसीलदारांना सादर केला. सदर ठिकाणी अनाधिकृत उत्खनन केल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) व (8) नुसार संबंधीतांना 6 कोटी 66 लाख 96 हजार 590 रुपयांचा दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्याची नोटीस तहसीलदार अमोल निकम यांनी बजावली आहे. 7 दिवसांच्या आत संबंधीतांना खुलासा करण्याची मुदत देण्यात आली असून खुलासा सादर न केल्यास अनाधिकृतपणे गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी दंडात्मक आदेश पारीत करण्यात येईल असेही तहसीलदारांनी बजावलेल्या नोटीसमध्येे म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com