हैदराबाद एन्काउंटर विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; उद्या सुनावणी
Featured

हैदराबाद एन्काउंटर विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; उद्या सुनावणी

Sarvmat Digital

हैदराबाद – हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींचे शुक्रवारी पोलिसांनी एन्काउंटर केले. या एन्काउंटरविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. शुक्रवारी पहाटेच पोलिस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौघांनाही गोळ्या घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

वकील जीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ही कारवाई करताना पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या 2014 च्या आदेशाचं उल्लंघन केलं, असं या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता असून त्यांच्यावर कारवाई केली जावी असे याचिकेत म्हटले आहे.

तसंच या कारवाईचे समर्थन करणार्‍यांविरोधातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोहरलाल शर्मा यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. माध्यमांवरही गॅग ऑर्डर चालवण्याची मागणी त्यांनी केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फतही याची चौकशी व्हावी, असं त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com