Tuesday, May 14, 2024
HomeUncategorizedकशी आहे लसनिर्मितीतली प्रगती ?

कशी आहे लसनिर्मितीतली प्रगती ?

सध्या संपूर्ण वैद्यकीय जगताचं लक्ष कोरोना विषाणूवर केंद्रित झालं आहे. जगभरात 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. म्हणूनच संशोधक, शास्त्रज्ञ कोरोना विषाणूविरोधातली लस शोधण्याच्या कार्यात गुंतले आहेत. काही आशेचे किरण दिसत आहेत. माणसांवरील चाचण्या यशस्वी होत आहेत. मात्र या लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचं आव्हान आहेच.

महेश जोशी

कोरोना विषाणूचं संकट टळताना दिसत नाही. आपल्याला कोरोनासोबतच रहायचं आहे. मात्र या विषाणूवर मात करण्यासाठी लस किंवा औषध उपलब्ध होणं गरजेचं आहे. ‘कोविड – 19’ च्या प्रादुर्भावाची सुरूवात होऊन आता जवळपास सहा महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या आजारावर प्रभावी असं औषध किंवा लस सापडलेली नाही. ठिकठिकाणी कोरोनाविरोधातल्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. जगभरातल्या 100 पेक्षा अधिक औषध कंपन्यांचे तसंच संशोधन संस्थांचे चमू लसनिर्मितीसाठी दिवसरात्र एक करत आहेत. कोविड-19 विरोधातली लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येकजण झटत आहे. काही कंपन्या, संस्था लसनिर्मितीच्या या स्पर्धेत पुढे गेल्या आहेत. काहींनी माणसांवर चाचण्या सुरू केल्या आहेत तर काहींनी लसनिर्मितीसाठी वेगळी वाट निवडली आहे.

आता लसनिर्मितीबाबत देश-विदेशातून काही चांगल्या बातम्या येत आहेत. आशादायी चित्र तयार होत आहे. कोरोनाविरोधातली लस सापडली तर जग पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकतं. येत्या काळात कोरोनाविरोधातली लस उपलब्ध होण्याबाबत शास्त्रज्ञ आशावादी आहेत. ‘ऑक्सफर्ड विद्यापीठातही लसींच्या चाचण्या सुरू आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी सप्टेंबरपर्यंत लस उपलब्ध होऊ शकेल, असा दावा ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ करत आहेत. या शास्त्रज्ञांनी वेगळीच पद्धत वापरली आहे.

- Advertisement -

निरुपद्रवी विषाणूंच्या माध्यमातून मानवी पेशींमध्ये कोरोना विषाणूची जनुकं तयार केली जात आहेत. ही जनुकं पुढे जाऊन विशिष्ट प्रथिनांची निर्मिती करतील. यामुळे शरीर कोरोना विषाणूविरोधात प्रतिकारक्षमता विकसित करू शकेल. चीनमधल्या कॅनसिनो बायोलॉजिक्स नामक कंपनीनेही लसनिर्मितीसाठी हीच पद्धत अवलंबली आहे. त्यांनी मानवी चाचण्यांना सुरूवात केली आहे.
मॉडर्ना नावाच्या अमेरिकन कंपनीने एक पाऊल पुढे टाकत माणसांवर कोरोनाविरोधी लसीची यशस्वी चाचणी केली आहे. कंपनीने आठ आरोग्य कार्यकर्त्यांवर लसीची चाचणी केली. ही चाचणी यशस्वी ठरली. पुढच्या काळात 600 जणांवर लसीची चाचणी घेण्यात येईल. या लसीची क्षमता तपासण्यासाठी अधिकाधिक लोकांवर चाचणी घेण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीचे सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचं मॉडर्नाने जाहीर केलं. ही लस सुरक्षित असून कोरोना विषाणूविरोधात शरीरात प्रतिकारक्षमता विकसित करण्यास सक्षम असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कोरोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी मॉडर्नाने नवी आणि वेगळी पद्धत वापरली आहे. या पद्धतीत पेशी सर्व प्रथिनं तयार करून शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचवतात. ‘फायझर’ कंपनीने लसनिर्मितीसाठी ‘बायो एन टेक एसई’या जर्मन कंपनीसोबत सहकार्य केलं आहे. या दोन्ही कंपन्यांनी माणसांवरील प्राथमिक चाचणीसाठी लसीचे नमुने अमेरिकेला पाठवले आहेत. जर्मनीत याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या लसीच्या चाचण्या यशस्वी ठरल्या, काही सकारात्मक बाबी समोर आल्या तर अमेरिकेचं अन्न व औषध प्रशासन ऑक्टोबरपर्यंत या लसीच्या आपत्कालीन वापराचे अधिकार देऊ शकतं, असं फायझरने म्हटलं आहे.

प्राण्यांवर होणार्‍या लसींच्या चाचण्याही यशस्वी ठरताना दिसत आहेत. याच कारणामुळे सर्वांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. ‘इनोव्हियो फार्मास्युटिकल्स’ या कंपनीच्या लसीच्या प्रयोगातूनही सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत. या लसींची चाचणी उंदीर आणि गिन्यूआ डुक्करांवर घेण्यात आली. या लसीमुळे उंदीर आणि डुक्करांच्या शरीरात संरक्षणात्मक अँटीबॉडीज तयार झाल्या. तसंच त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही वाढली. या संशोधनाबाबत विस्टार इन्स्टीट्यूटच्या वॅक्सिन अँड इम्युनोथेरेपी केंद्राचे संचालक डॉ. डेव्हिड वेनर म्हणतात, या लसीच्या चाचणीदरम्यान अँटीबॉडीजचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. एखाद्या लसीच्या विकासाच्या दृष्टीने ही खूप सकारात्मक बाब आहे.

बेथ इस्राएल डिएकोनेस मेडिकल सेंटरनेही मध्यंतरी एक अहवाल प्रदर्शित केला होता. या संस्थेने माकडांवर चाचण्या केल्या आहेत. या लसीच्या नमुन्याची चाचणी माकडांवर घेण्यात आल्यानंतर त्यांना या विषाणूविरोधात संरक्षण मिळाल्याचं दिसून आलं आहे. माकडांवरील चाचण्यांमधून आशादायक चित्र दिसल्यानंतर पुढे माणसांवरच्या प्रयोगांचा मार्ग मोकळा होणार असल्याचंही या केंद्रातल्या संशोधकांचं म्हणणं आहे. ही सगळी संशोधनं आणि त्याचे निकाल खूपच सकारात्मक आहेत. म्हणूनच पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाविरोधी लस उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कदाचित एकापेक्षा अधिक लसी उपलब्ध होऊ शकतील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सध्या जवळपास 20 लसींचे नुमने वैद्यकीय चाचणीसाठी सज्ज होत असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्रासमोर कोरोना विषाणूविरोधातल्या लसीची निर्मिती हेच ध्येय आहे. मात्र सार्स-कोव्ह-2 विषाणूविरोधातल्या संरक्षणात्मक प्रतिकारशक्तीबाबत अद्याप खूप कमी माहिती असल्याचं बीआयडीएमसीतल्या वायरोलॉजी आणि वॅक्सिन रिसर्च विभागाचे संचालक डॅन एच. बॅरोच यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणतात, लस उपलब्ध होणं गरजेचं असलं तरी कोणत्याही लसीची निर्मितीप्रक्रिया प्रदीर्घ असू शकते. ही बाब लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच एखदी लस फक्त 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत उपलब्ध करून देणं अत्यंत आव्हानात्मक आहे. असं झाल्यास ही सर्वात कमी वेळेत उपलब्ध झालेली लस ठरू शकेल.

एखाद्या आजारावरील लसीच्या निर्मितीला प्रदीर्घ कालवधी लागू शकतो. काही वेळा हा काळ दहा वर्षांपेक्षाही अधिक असू शकतो. मात्र कोरोनाविरोधातल्या लसीसाठी एवढा काळ जाऊन चालणार नसल्यामुळे शास्त्रज्ञही शक्य तितक्या वेगाने पुढे जात आहेत. कोणत्याही विषाणूविरोधातल्या लसनिर्मितीबाबतचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विषाणू सतत स्वत:च्या रचनेत बदल करत असतात. त्यांचा आकार बदलत असतो. त्यामुळे विषाणूच्या एका प्रकारावर प्रभावी ठरणारे अँटीबॉडी दुसर्या प्रकारावर पूर्णपणे अपयशी ठरतात. सुदैवाने नव्या कोरोना विषाणूमधल्या बदलांचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे चाचण्यांमध्ये सकारात्मक निकाल दर्शवणारी लस जगाच्या कोणत्याही कोपर्यात प्रभावी ठरू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोरोना विषाणूविरोधातल्या लसीची निर्मिती झाली तरी ती उपलब्ध करून देणं हे खूप मोठं आव्हान असेल. आज कोरोना विषाणू जगातल्या जवळपास प्रत्येक देशात पोहोचला आहे. या पृथ्वीतलावर राहणार्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाविरोधी लस घ्यावी लागेल. कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी प्रत्येकाला दोन डोस घ्यावे लागतील. जगाची लोकसंख्या बघता 16 अब्ज डोस उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. हे आव्हान कोणती कंपनी कशी पेलणार यावर भविष्यातल्या घडामोडी अवलंबून असतील. मात्र जागतिक स्तरावर सुरू असणार्या या संशोधनप्रक्रियांमुळे आशेचा एक किरण निर्माण झाला आहे हे नक्की!

- Advertisment -

ताज्या बातम्या