ढाबे, हॉटेलवर एक्साईजची नजर
Featured

ढाबे, हॉटेलवर एक्साईजची नजर

Sarvmat Digital

7 पथकांची नियुक्ती । नाताळ, नववर्षानिमित्त तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठया प्रमाणात पार्टी व इतर कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 7 पथकाची नियुक्ती केली आहे. ही पथके अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि वाहतुकीला आळा घालतील अशी माहिती एक्साईजचे एसपी पराग नवलकर यांनी दिली.

राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्षा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांचे आदेशानुसार व अधीक्षक पराग नवलकर तसेच उपअधीक्षक सी पी निकम यांचे नेतृत्वाखाली अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतुकीला आळा घालण्याकरिता जिल्ह्यात 5 पथके व 2 भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत.
अहमदनगर विभागाचे विशेष पथकामार्फत रात्रीची गस्त घालण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व परवानाकक्ष अनुज्ञप्त्या व ढाबे यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे.

नाताळ व नववर्षाच्या प्रारंभाच्या कालावधीत माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच), डयुटी फ्री स्कॉच या नावाने बनावट व भेसयुक्त मद्य विक्रीचे प्रकार झाले आहेत. भेसळयुक्त मद्य विक्रीतून मद्य प्राशान करणार्‍या ग्राहकांची आर्थिक फसवणुक होते. त्याचबरोबर मद्य सेवनाने आरोग्यावर देखील परिणाम होतो. अनुज्ञप्ती धारकांनी सर्व नियमांचे पालन करुन ग्राहकांना मद्य पिण्याच्या परवान्यावर मद्य विक्री करावी. अनुज्ञप्तीधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठारे कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

व्हॉटस्अ‍ॅपवर द्या बोगस दारूची माहिती
अवैध व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळून आल्यास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 नुसार तसेच ढाब्यांवर जागा मालकांविरुध्द सुध्दा गुन्हा दाखल करुन वैद्यकीय तपासणी करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त व बनावट मद्य अथवा अवैध मद्यविक्रीची माहती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18208333333 हा टोल फ्री आणि 8422001133 या व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी कळविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com