बारागाव नांदूरच्या मुख्याध्यापकाची अखेर उचलबांगडी

बारागाव नांदूरच्या मुख्याध्यापकाची अखेर उचलबांगडी

बारागाव नांदूर (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील संत तुकाराम विद्यालय शाळेतील मुख्याध्यापकाची ग्रामस्थांच्या तक्रारीवरून श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासनाने अखेर उचलबांगडी केली. मुख्याध्यापक हरिश्‍चंद्रे यांची बदली झाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनात सुधारणा होईल का? आता मास्तर शाळेत वेळेवर येतील का? असा सवाल पालकांनी प्रशासनाला विचारला आहे.

बारागाव नांदूर गावातील संत तुकाराम विद्यालय शाळा अग्रगण्य समजली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून शाळेमध्ये कामकाज कमी तर राजकारण अधिक सुरू झाले. शिक्षकांमध्ये गट तट निर्माण झाले. तर तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळासह शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळानेही दुर्लक्ष केल्याने शाळेमध्ये मनमानी कारभार सुरू होता.

दरम्यान, मागील आठवड्यात सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संत तुकाराम विद्यालयास अचानक भेट दिली होती. त्यावेळी 12 वाजेपर्यंत शाळेत सर्व शिक्षक आलेले नव्हते. मुख्याध्यापक हरिश्‍चंद्रे यांनी 12 वाजता हजर होत शाळेचे कामकाज सुरू केले. शिक्षकांना जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते बोलावून घेतात. तेव्हा त्यांना पाठवावे लागते, असे उत्तर मुख्याध्यापक हरिश्‍चंद्रे यांनी ग्रामस्थांना दिले. राष्ट्रगीत व प्रार्थना घेण्यासाठीही शिक्षक अनुपस्थित असल्याची धक्कादायक परिस्थिती दिसून आली. ही बाब दै. सार्वमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासक पारखे यांनी तातडीने योग्य कारवाई करीत ग्रामस्थांना बोलावून घेत योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

मुख्याध्यापक हरिश्‍चंद्रे यांची संत तुकाराम विद्यालयातून उचलबांगडी केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी पारखे, संचालक शिवाजी सयाजी गाडे व निवडक पदाधिकार्‍यांना बोलावून घेत शाळेत गुप्त बैठक घेण्यात आली. ग्रामस्थ व पालकांना बोलविण्यात आले नाही. परिणामी शाळेच्या सुधारणेबाबत घेतलेल्या निर्णयापासून पालक व ग्रामस्थांना अलिप्त ठेवण्यात आले. तनपुरे कारखाना संचालक मंडळासह प्रशासनाचे संत तुकाराम विद्यालयाकडे दुर्लक्ष असून शिक्षण संस्थेमध्ये राजकारण न करता विद्यार्थ्यांचा चांगले शिक्षण मिळावे अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com