16 तरूणांच्या फसवणुकीनंतरही आरोपी मोकाटच
Featured

16 तरूणांच्या फसवणुकीनंतरही आरोपी मोकाटच

Sarvmat Digital

नोकरीच्या आमिषाने एक कोटी 26 लाख हडपले; पगाराचे कोट्यवधीही बुडाले

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिक्षक, शिपाई म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून आतापर्यंत 16 तरुणांची फसवणूक केली. नोकरीसाठी एक कोटी 26 लाख रुपये घेत पगाराचे कोट्यवधी रुपये बुडविणारे भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्त अद्याप मोकाट आहे. भिंगार कॅम्प पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍यांच्या तपासाबाबत आणि एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात आहे. उच्चशिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने संस्था चालकांकडून लाखो रूपये घेऊन नोकरी दिली जात आहे. असाच काहीसा प्रकार भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांकडून करण्यात आला. जिल्हातील 16 तरुणांना नोकरीला लावून देतो म्हणून एक कोटी 26 लाख रुपये घेतले. तरुणांची मुलाखत घेतली, ऑर्डर मिळवून देण्याची हमी दिली. तरुणांनी काही दिवस नोकरी पण केली. परंतु त्यांना पगार देण्यात आला नाही. नोकरीसाठी पैसे भरले व नोकरी केल्यानंतर पगाराचे पैसे मिळाले नाहीत.

या सर्व तरुणांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष, विश्वस्तांविरोधात फिर्यादी दिल्या आहेत. पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिंगार पोलिसांनी 16 तरुणांची फसवणूक झालेले गुन्हे दाखल केले आहेत. अजून चार ते पाच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. भिंगार पोलीसांनी संस्थेचे अध्यक्ष सुभाष साळवे याचा मुलगा अनुराग साळवेला अटक केली आहे. परंतु पोलिसांना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या आरोपींना फसवणूक झालेल्या तरुणांनी भरलेले पैसे व पगाराची रकमेची मागणी केली असता संस्थेच्या अध्यक्षांसह विश्वस्तांकडून या तरुणांना धमकी देण्यात येत आहे. तसा तरुणांनी दिलेल्या फिर्यादीत उल्लेख केला आहे. तरी पण पोलीस या घटनेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. फसवणूक केलेल्यांना अटक कधी करणार असा प्रश्न तरुणांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याशी संपर्क केला असता, फसवणूक झालेल्या प्रकरणाची संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडून माहिती घेतो व पुढील कारवाईसंदर्भात सूचना करतो असे मिटके यांनी सांगितले.

फसवणूक प्रकरणी सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांवर हायकोर्टाच्या आदेशाने स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणुकीच्या एका गुन्ह्यातील पैसे खात्यावर वर्ग केल्याप्रकरणात संस्थेच्या अध्यक्षांच्या मुलाला अटक केली आहे. अध्यक्ष व विश्वस्तांचा आम्ही शोध घेतला पण ते आढळून आले नाहीत. त्यांच्या शोधासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– प्रवीण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, भिंगार कॅम्प

Deshdoot
www.deshdoot.com