सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांची पर्वणी; पाच दिवसांच्या आठ्वड्यामुळे डिसेंबर पर्यंत मिळणार 102 दिवस सुट्ट्या
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांची पर्वणी; पाच दिवसांच्या आठ्वड्यामुळे डिसेंबर पर्यंत मिळणार 102 दिवस सुट्ट्या

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनें पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्यानंतर युवा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये देखील वाढ होणार आहे. या वर्षात उरलेल्या दहा महिन्यातील 307 दिवसांपैकी 102 दिवस सुट्ट्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार असून जोडून येणाऱ्या सुट्टयांदरम्यान अतिरिक्त रजा घेऊन सुट्ट्यांची पर्वणी साधणे शक्य होणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कामाचा पाच दिवसांचा आठवडा सरकारने नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयानुसार शनिवारच्या 44 सुट्ट्या अधिक मिळणार आहेत. त्यात या कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्या घेण्याची संधी या वर्षातील उर्वरित महिन्यांमध्ये सुमारे 11 वेळा मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये बहुतांश वेळा कर्मचारी रजेवर असल्याचे उत्तर ऐकायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. सलग सुट्ट्यांचे चित्र सरकारी कार्यालयांमध्ये मार्च, एप्रिल, मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये दिसणार आहे.

या महिन्यांमध्ये शनिवारला जोडून सुट्ट्या असल्याने सलग चार चार दिवसांची सुट्ट्यांची पर्वणी कर्मचाऱ्यांना साधता येणार आहे. मार्चमध्ये 7 आणि 8 तारखेला शनिवार, रविवारच्या सुट्ट्या घेऊन 9 तारखेला रजा टाकली कि 10 मार्चला धुलिवंदनाची सुट्टी घेता येईल. तर काहींना गुढीपाडवा साजरा करण्यासाठी 21 व 22 मार्च जोडून 23 व 24 तारखेला रजा टाकून गुढीपाड्व्यापर्यंत सुट्टी मिळवता येईल.

दि. 2 ते 6 एप्रिल रामनवमी ते महावीर जयंती असे चार दिवस, दि. 10 एप्रिल ते 14 एप्रिल म्हणजे गुड फ्रायडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान देखील चार दिवसांची सुट्टी घेणे सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य होणार आहे. मे महिण्यात दि. 1 ते दि. 3 दरम्यान आणि दि. 23 ते 25 मे अशा दोन वेळा रजा व सुट्ट्या एकत्र घेणे शक्य होणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील 30 तारखेला शुक्रवारी ईदची सुट्टी असून जोडून शनिवार, रविवार असून सलग तीन दिवस तर नोव्हेंबरात दिवाळी सण असल्याने दि. 14 ते 16 आणि दि.28 ते 30 अशी सलग सुट्ट्यांची संधी आहे. वर्षअखेरीस येणारा नाताळचा सण देखील शुक्रवारी येत असल्याने दि. 27 डिसेंबरपर्यंत किंवा रजा टाकून अधिक दिवसांची सुट्टी सरकारी कर्मचाऱ्यांना उपभोगता येणार आहे.

महिनानिहाय अशा आहेत सुट्ट्या

मार्च 11 दिवस, एप्रिल बारा दिवस, मे 13 दिवस, जून 8 दिवस, जुलै 8 दिवस, ऑगस्ट 11 दिवस, सप्टेंबर 8 दिवस, ऑक्टोबर 11 दिवस, नोव्हेंबर 11 दिवस, डिसेंबर 9 दिवस

Deshdoot
www.deshdoot.com