पारनेर तालुक्यात पुन्हा  गोळीबार; तरुण जखमी
Featured

पारनेर तालुक्यात पुन्हा गोळीबार; तरुण जखमी

Dhananjay Shinde

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यांमध्ये गुणवरे परिसरामध्ये रस्त्यात भांडणे सुरू असताना तिथून जात असणार्‍या मोटारसायकल स्वाराला गोळी लागून तो जखमी झाला आहे. पारनेर तालुक्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना असून पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. तालुक्यात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा सुळसुळाट झाला आहे. त्याला रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. गुणवरे येथील गोळीबारात संजय बाळू पवार (रा.राळेगण थेरपाळ, वय- 23) जखमी झाला आहे.

दि. 5 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गुणवरे ते शिणगरवाडी रस्त्याच्याकडेला एका ओढ्याजवळ चौघांची भांडणे सुरू होती. त्याच वेळी राळेगण थेरपाळ येथील संजय पवार हे आपल्या मेव्हण्यास भेटण्यासाठी टाकळी हाजीकडे दुचाकीवरून निघाले होते. शीणगरवाडी ओढ्याजवळ आले असता तिथे सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला.

त्याचवेळी त्यातील एकाने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून एक गोळी झाडली. मात्र, ही गोळी नेमकी पवार यांच्या हाताला लागल्याने ते जखमी झाले. पवार यांना गोळी लागताच त्या चौघांनी तेथून पळ काढला. पवार यांच्या हाताला गोळी चाटून गेल्याने त्यांना उपचारासाठी शिरूर येथे हलवले. तेथे त्याच्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पवार यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करत आहेत.

गोळीबार झाला तेथे भेट दिली आहे. मात्र तेथे रक्त किंवा गोळी सापडली नाही. तसेच ही जागा पारनेर व शिरूर तालुक्याच्या हद्दीवरची आहे. भांडणे कोणत्या ठिकाणी झाली हे देखील माहिती नाही. नेमकी भांडणे कोणाची झाली याचा शोध चालू आहे.
– विजयकुमार बोत्रे, पोलीस उपनिरीक्षक, पारनेर.

Deshdoot
www.deshdoot.com