शेतकर्‍यांनी ठरविले शेतमजुरी कामाचे दर

शेतकर्‍यांनी ठरविले शेतमजुरी कामाचे दर

टाकळीमियात बैठक; मजुरांना अमान्य

टाकळीमिया (वार्ताहर)-  राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शेतमजुरीच्या कामाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. ठरलेल्या दराने मजुरी देण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र शेतकर्‍यांनी ठरवलेले दर आम्हाला मान्य नसल्याची प्रतिक्रिया शेतमजुरांनी दिली आहे.

शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत येत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, विचित्र हवामान अशा नैसर्गिक आपत्ती तर आलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यातच वेळेवर शेतमजूर न मिळणे आणि मिळालेच तर त्यांनी वाढवलेली मजुरी यासर्व समस्येमुळे शेतकरी भरडला जात आहे. टाकळीमिया परिसरात शेतमजुरांची संख्या मोठी आहे. मात्र तोच मजूर येथे काम असूनही बाहेरगावी मजुरीसाठी जातो त्यांना जाण्यायेण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

त्यामुळे सहाजिकच गावातील शेतकर्‍यांना शेतमजूर वेळेवर मिळत नाहीत. मिळाले तर ते अव्वाच्या सव्वा मजुरी मागतात. त्यासाठी गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत शेतमजुरीचे दर निश्चित करण्यात आले तसेच शेतमजुरांना बाहेरगावी घेऊन जाणारे रिक्षा, मिनी टेम्पो यांनाही चाप लावण्यासाठी त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला व हा गावचा गंभीरप्रश्न असल्याने हा विषय ग्रामपंचायतीच्या सभेसमोर ठेवला.

शेतकर्‍यांच्या बैठकीत मजुरीचे ठरवलेले दर पुढीलप्रमाणे- महिला मजूर खुरपणी व इतर कामाची रोजंदारी 200 रुपये वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, कांदा लागवडीसाठी सरी कांदा लागवड एकरी 6000 रुपये वाफा किंवा बेड कांदा लागवड रोप उपटण्यासह 7000 रुपये तसेच बाहेरगावी मजुरीसाठी बाहेर गावी जाणार्‍या प्रत्येक महिलेला 100 रुपये व त्यांना घेऊन जाणारे रिक्षा, टेम्पो यांना 200 रुपये दंड, त्याचप्रमाणे ऊस लागवडीसाठी प्रतिएकर 4000 रुपये याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले. मात्र हे सर्व दर मान्य नसल्याचे मजुरांनी सांगितले.

या बैठकीस केशव शिंदे, रवींद्र मोरे, सुरेश भानुदास करपे, बाळासाहेब निमसे, सुभाष करपे, सुरेश निमसे, अशोक कवाणे, भाऊसाहेब काळे, रामभाऊ तारडे, डॉ. संजय कुलकर्णी, राजेंद्र निमसे, सुनील कुलकर्णी, बाबासाहेब शिंदे, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय चोथे, वेणूनाथ मोरे, संजय करपे, संजय आढाव, रावसाहेब कवाणे, नानासाहेब मोरे, आप्पासाहेब माळवदे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवसभर राबायचे, काबाडकष्ट करायचे आज बाजारात प्रत्येक जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत. एक पायली धान्यासाठी दोनशे रुपये द्यावे लागतात. भाजीपाला महाग झाला. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशा महागाईमध्ये शेतकर्‍यांनी ठरवलेल्या दरात आम्हाला परवडत नाही. कांदा लागवडीसाठी सकाळी लवकर जाऊन उशिरा सुटी मिळते. दिवसभर पाण्यात कांदे लावावे लागतात. आमचापण जीव आहे. गावात महिला मजुरांची संख्या जास्त आहे. सिझन आला की सर्वच शेतकरी गडबड करतात. मात्र त्यांचे काम संपले तर आम्ही काय घरी बसायचे का? आम्हाला पोटासाठी मिळेल तेथे कामासाठी जावेच लागेल. गावातील शेतकर्‍यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही.
-एक शेतमजूर महिला.

शेतकरी सर्वच बाजूने संकटात सापडला आहे. मजुरांना कामाची गरज आहे. त्यांचेही हातावरचे पोट आहे. मात्र ही समस्या फारच गंभीर आहे. शेतकर्‍यांनी हा प्रश्न ग्रामपंचायत मिटींगमध्ये आणला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी अशा प्रश्नावर लक्ष देऊन शेतात काम करणार्‍या मजुरांची निम्मी मजुरी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून द्यावी यासाठी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे मागणी करणार आहोत.
-रवींद्र मोरे, माजी सरपंच, टाकळीमिया.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com