जिल्ह्यात सर्वदूर आजपासून कर्जमाफीची प्रक्रिया
Featured

जिल्ह्यात सर्वदूर आजपासून कर्जमाफीची प्रक्रिया

Dhananjay Shinde

ब्राम्हणी, जखणगावातील शेतकर्‍यांच्या कर्जापोटी बँकांच्या खात्यावर पावणेतीन कोटींची रक्कम वर्ग

अहमदनगर (प्रतिनिधी) – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत नगर जिल्ह्यात 2 लाख 58 हजार 787 शेतकर्‍यांना 2 हजार 296 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यासाठी आजपासून जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांच्या आधारचे प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी आणि नगर तालुक्यातील जखणगावातील शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिककरण जवळपासून पूर्ण झाले असून सरकारकडून कर्जमाफीपोटी बँकांच्या खात्यावर 2 कोटी 76 लाख 55 हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ देण्याचा घोषणा केली. यासाठी अवघ्या 30 दिवसांत राज्यातील कर्जदार शेतकर्‍यांची माहिती मिळवित, प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावात कर्जमाफीची प्रक्रिया राबविली देखील आहे. आजपासून कर्जमाफीची राज्यभर सार्वत्रिक प्रक्रिया राविण्यात येणार आहे. ब्राम्हणी आणि उंबरे गावात राबविलेल्या प्रक्रियेप्रमाणेच ही

राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात या कर्जमाफीसाठी 2 लाख 58 हजार 787 शेतकरी पात्र असून त्यांना 2 हजार 296 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफीसाठी आधार प्रमाणिककरण पूर्ण झालेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी ब्राम्हणी गावातील बँकांच्या खात्यावर 2 कोटी 42 लाख 21 हजार तर जखणगावातील बॅकांच्या खात्यावर 34 लाख 34 हजार रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. आता संबंधीत बँका कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग करून त्यांचे कर्जखाते बंद करणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com