Featured

1ली ते 8वीच्या परीक्षा रद्द

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई- कोरोनाचं महाभयंकर संकट रोखण्यासाठी राज्य सरकारनं मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली. नववी व अकरावीचे उर्वरित पेपर 15 एप्रिलनंतर होणार आहेत. दहावीचे उरलेले पेपर मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असं गायकवाड यांनी सांगितलं.

बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता नववी ते 11ची परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळणं हा कोरोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्यादृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत.

गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. राज्य सरकारनं मॉल, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या होत्या. मात्र, करोना विषाणू फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांना घरून काम करण्याची परवानगी
दहावीचे शिक्षक सोडून इतर सर्व शिक्षकांनी घरूनच काम करावे, अशा सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, शिक्षक संघटनांनी 10 वीच्या परीक्षांचे पेपर घरीच तपासण्यासाठी द्यावेत अशी मागणी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com