कला शाखेच्या शेतकरीपुत्रांनाच परीक्षा शुल्कमाफी
Featured

कला शाखेच्या शेतकरीपुत्रांनाच परीक्षा शुल्कमाफी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये आलेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झेलणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाल्यांना परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यात केवळ कला महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित अन्य शाखांमधील पात्र शेतकरीपुत्रांना शुल्कमाफी मिळणार नसल्याचे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले. या निर्णयामुळे अन्य शाखेतील शेतकरी पाल्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही सवलत सरसकट द्यावी अशी मागणी होत आहे.

राज्यात 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्यांमध्ये पारंपरिक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. यात नुकसानग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत आणि विविध सवलती लागू करण्याचा निर्णय महसूल व वन विभागांकडून 18 नोव्हेंबर 2019 रोजी जारी करण्यात आला. या शासन निर्णयान्वये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पाल्यांना शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय झाला.

त्याअनुषंगाने कला संचालनालयाच्या नियंत्रणातील कला महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी सवलत देण्याचे आदेश विद्यापीठ तसेच कला संचालनालयास देण्यात आले आहे. याचा लाभ सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना मिळेल. शासन परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले असेल, त्यांना संबंधित संस्थांकडून परत करावे लागणार आहे. ही सवलत केवळ आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेखाली शिष्यवृत्तीासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना 50 टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळेल. या योजनेत पात्र रकमेची मागणी महाविद्यालयांनी विद्यापीठ अथवा कला संचालनालयाकडे करावी, असे नमूद केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com