पिकपध्दतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा
Featured

पिकपध्दतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

कृषीमंत्री दादा भुसे यांचे आवाहन ; सह्याद्री फार्म्स येथे ‘एफपीसी इन्क्युबेशन कार्यशाळा आयोजित

नाशिक :

आपल्या जिल्ह्यातील, विभागातील पिकपध्दतीचा प्राधान्याने विचार करुन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करा. शेती फायद्याची करायची असेल तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. केवळ अनुदान व लाभाच्या अपेक्षेने यात न येता समर्पित होऊन काम करा. असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी येथे शुक्रवारी (ता.14) ‘एफपीसी इन्क्युबेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुहास दिवसे, ‘स्मार्ट’ योजनेचे अतिरिक्त संचालक तांबारे, फलोत्पादन संचालक जमदाडे, वर्ल्ड बँकेचे सल्लागार विजय शेखर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय पडवळ, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित होते

सह्याद्री सारख्या शंभर कंपन्या उभ्या रहाव्यात

दादा भुसे म्हणाले की, शेती फायद्याची होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार आणि उद्योजकता यांचा समन्वय असलेली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना उपयुक्त आहे. यातील राज्यातील आदर्श मॉडेल म्हणून ‘सह्याद्री’ उभी राहिली आहे. राज्यभरात अशा शेतकऱ्यांच्या किमान शंभर कंपन्या उभ्या रहाव्यात ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची संकल्पना आहे. त्यानुसार येत्या काळात गती देण्यात येणार आहे. अडचणीतील कंपन्यांनाही सहकार्य केले जाणार आहे.

एकनाथ डवले म्हणाले, इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून राज्यातील फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना सक्षम व स्वयंपूर्ण करण्यात येणार आहे. सुहास दिवसे यांनी ‘स्मार्ट’ योजनेच्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, येत्या काळात इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कंपन्यांचे बळकटीकरण करण्यात येईल.

विलास शिंदे व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संदीप शिंदे यांनी ‘इन्क्युबेशन सेंटर’ संकल्पनेचे सादरीकरण केले. ‘टाटा स्ट्राईव्ह’चे अमेय वंजारी यांनी विविध कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. गौरव सोमवंशी, कल्याणी शिंदे, आशिष म्हाळणकर यांनी शेतीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरात येणाऱ्या आधुनिक प्रणालींचे सादरीकरण केले. अधीक्षक कृषि अधिकारी सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेस राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘‘मागील 20 वर्षांपासून ‘सह्याद्री’ने फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना विकसित केली आहे. सह्याद्री सारखे मॉडेल्स राज्याच्या सर्व भागात होणे हा विचार पुढे आला. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात स्थापन झालेल्या 2 हजार कंपन्यांना सक्षम करण्यासाठी ‘सह्याद्री’ डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर या कंपनीच्या सहकार्याने ‘एफपीसी इन्क्युबेशन सेंटर’ची सुरु करण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात हे काम सुरु होणार आहे.’’

– विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. मोहाडी.

Deshdoot
www.deshdoot.com