अडीअडचणींच्या सोडवणूकीसाठी मंच स्थापन करा : माजी आमदार वाजे
Featured

अडीअडचणींच्या सोडवणूकीसाठी मंच स्थापन करा : माजी आमदार वाजे

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

कुळाच्या 17व्या राज्यस्तरीय स्नेहसंमेलनात यांचे आवाहन

डुबेरे । वार्ताहर

एकमेकांच्या ओळखीसह विचारांची अदान प्रदान व्हावी असा विचार 17 वर्षांपूर्वी वाजे कुळातील एका व्यक्तीच्या डोक्यात आला. त्यांनी सुरु केलेल्या स्नेहसंमेलनामुळे आज आपण येथे एकत्र आलो आहोत. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपल्या अडीअडचणींच्या सोडवणूकीसाठी एखादा मंच स्थापन करावा व त्याच्या माध्यमातून आपला उध्दार व्हावा अशी अपेक्षा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली.

वाजे कुळाच्या 17व्या राज्यस्तरीय स्नेहसंमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. गुजरात राज्यातील कपराडा येथील वाजे कुळातील ढवळू वाजे यांनी ‘वाजे कुळाचे स्नेहसंमेलन’ ही संकल्पना अंमलात आणली. एकमेकांच्या ओळखीसह विचारांची देवाण-घेवाण व अडीअडचणीत मदत व्हावी असा त्यामागचा उद्देश असल्याचे आ. वाजे म्हणाले. राजकारणापेक्षा समाजकारणाकडे लक्ष द्या. कारण राजकारण करत असताना समाजकारण करणे अवघड असल्याचा आपला अनुभव आहे असे ते म्हणाले.

व्यासपीठावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधिश तुषार वाजे, समाज कल्याण आयुक्त प्राची वाजे, मविप्रचे संचालक हेमंत वाजे, अकोलेचे सीईओ अर्जुन वाजे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वाजे, विंचूर ज्ञानप्रबोधिनी संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाजे, पुसाणेचे सरपंच हिरामण वाजे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुकदेव वाजे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल वाजे आदींसह मान्यवर उपस्थित होते. जो इतरांना मदत करतो तो मोठा होतो. मात्र, जो सर्वांना बरोबर घेऊन चालतो तो महान ठरतो.

त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले जनसेवक राजाभाऊ वाजे आहे, त्यांचा आपल्याला अभिमान आहे असे न्यायाधिश वाजे म्हणाले. एकमेकांच्या संपर्कात राहून अडीअडचणीत मदत करत जा. एखाद्याला शिक्षणाची आवड असेल, मात्र आर्थिक परििस्थितीमुळे त्याला अडचण येत असेल तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. काशिनाथ वाजे, चंदर वाजे, उत्तम वाजे, अनिल वाजे, शांताराम वाजे, धर्मराज वाजे, जालिंदर वाजे आदींनी मनोगत व्यक्त केले.

राज्य-पराज्यातून आलेल्या मान्यवरांचा तरुणांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी केले. आभार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायणशेठ वाजे यांनी मानले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल वाजे, मनोज शंकर वाजे, निमाचे संचालक बबनराव वाजे, योगेश वाजे, संजय वाजे, गणेश वाजे, राहूल  वाजे, पंकज वाजे, चेतन वाजे, विकास वाजे, किरण वाजे, योगेश वाजे, श्रीराम वाजे यांच्यासह तरुणांनी परिश्रम घेतले. जव्हार, दादरा नगर हवेली, मोखाडा, लासलगाव, विंचूर, कोपरगाव, पुसाणे, वाजेवाडी, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, धोंडबार, सांगली यासह गुजरात राज्यातील वाजे कुळातील लोक या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते.

18वे स्नेहसंमेलन बेलवंडीत

वाजे कुळाचे 18 वे स्नेहसंमेलन अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी येथे होणार असून त्या मेळाव्याच्या आयोजनाचे नारळ आजच्या मेळाव्यात चंदू वाजे, सुर्यकांत वाजे यांच्यासह वाजे परिवाराने उचलेले.

Deshdoot
www.deshdoot.com