पुणे विद्यापीठाचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
Featured

पुणे विद्यापीठाचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी व पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून रोजगाराभिमुख आणि तंत्रज्ञानावर भर देणारा नवीन अभ्यासक्रम विद्यापीठाकडून सुरू केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे चॉईस बेसड क्रेडिट सिस्टम (उइउड) नुसार मूल्यमापन केले जाणार आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रम बदलण्यास मान्यता देण्यात आली. यात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास या चारही विद्याशाखांकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. त्यात सुधारित अभ्यासक्रमात काय बदल अपेक्षित आहेत, त्यावर विचारमंथन झाले. त्यानंतर नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

द्वितीय वर्षाचा बदललेल्या अभ्यासक्रमात रोजगाराची क्षमता वाढविणार असनू, त्यात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच अध्यापन पद्धतील बदल असून, त्यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात आला आहे. ई-कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इनोव्हेशन, ब्लॉक चेन अशा गोष्टींचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.

दरम्यान विद्यापीठाने मागील वर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रेडीट प्रणाली लागू केली होती आणि यंदा दुसर्‍या वर्षी लागू करण्याची मान्यता देण्यात आली आहे.
बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एमबीए, फार्मसी, सर्व पदवी व पदव्युत्तर द्वितीय वर्षाचे अभ्यासक्रम बदलणार आहेत. या नवीन बदलासह, आठ ते दहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

नाविन्य आणण्याचा प्रयत्न – नवीन अभ्यासक्रम उद्योग क्षेत्राला पूरक आणि विद्यार्थ्यांना आवडेल, अशा पद्धतीने तयार करण्यात येत आहे. तसेच त्यात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आला पाहिजे, त्यांना रोजगारक्षम, नवीन कल्पनांचा विकास करता यावा अशी पद्धतीने शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले आहेत, असेही डॉ. एन. एस. उमराणी यांनी म्हटले आहे

Deshdoot
www.deshdoot.com