विळद आणि पिंप्री घुमटची निवडणूक पुढे ढकलली
Featured

विळद आणि पिंप्री घुमटची निवडणूक पुढे ढकलली

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील विळद आणि पिंप्री घुमट ग्रामपंचायतीसाठी 31 मार्चला मतदान होणार होते. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. मंगळवारी (17 मार्च) मुंबई येथे राज्य निवडणूक आयुक्तांनी याबाबत घोषणा केली. त्यानुसार नगर तालुक्यातील विळद आणि पिंप्री घुमट येथील ग्रामपंचायत निवडणूकही पुढे ढकलली गेली आहे.

या दोन्ही गावांत 31 मार्चला मतदान होणार होते. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारनेे राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित कार्यक्रम मंगळवारी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.

राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु आता पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com