तत्कालीन शिक्षणाधिकारी महाजन निलंबित

जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात तक्रारदार असलेले तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्यासह नाशिक विभागीय प्रभारी उपसंचालक नितीन बच्छाव यांना निलंबित करण्याचे आदेश सोमवारी पुणे आयुक्तालयाचे शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी दिले आहे.
दरम्यान, याबाबत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.किशोर पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडत कारवाईची मागणी केली होती.

नगरदेवळा, कजगाव, भडगावसह जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती करण्यात आली होती. तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या बनावट स्वाक्षरी प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणासंदर्भात शिक्षण उपसंचालकांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संबंधित तक्रारींची दखल घेऊन पुणे शिक्षण आयुक्तालयाचे शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांनी नाशिकचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव व नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी तथा जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना निलंबनाचे आदेश बजावले आहेत.

बच्छाव व महाजन यांना महाराष्ट्र नागरी सेवा आणि निलंबन, बडतर्फ सेवेतून काढून टाकणे या काळातील नियम 1981च्या नियम 68 नुसार निलंबन कालावधीत निर्वाहभत्ता व पुरकभत्ता देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार निर्वाह व पुरक भत्ता अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे. सदर प्रत नाशिक व जळगाव जिल्हा परिषदेण्या सीईओंना रवाना करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com