साठीतल्या तरुण महाराष्ट्रा…
Featured

साठीतल्या तरुण महाराष्ट्रा…

Balvant Gaikwad

महाराष्ट्र आज 60 वर्षांचा झाला. कमालीच्या तणावाच्या वातावरणात हा स्थापना दिन साजरा करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. परंतु अनेक बाबतीत देशापुढे आदर्श उभ्या करणार्‍या महाराष्ट्रानं आज आपल्या सर्व परंपरांचं स्मरण करण्याची गरज आहे. संघर्षाप्रमाणंच विवेकाची आणि विचारांचीही परंपरा महाराष्ट्र सांगतो.

डॉ. जयदेवी पवार

अंजन, कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळफुलांच्या, प्राजक्ताच्या दळदारी देशा
भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा

जितका रांगडा तितकाच कोमल, जितका भाविक तितकाच बुद्धिवान आणि कर्तृत्ववान असा हा महाराष्ट्र देश आज साठ वर्षांचा झाला. गोविंदाग्रजांनी वर्णन केलेल्या या मातीच्या सगळ्या गुणांची एकाच वेळी तीव्रतेनं गरज वाटू लागावी, अशा वळणावर आपण आपल्या महाराष्ट्राचा साठावा निर्मितीदिवस साजरा करतो आहोत. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असण्याची वेळ मराठी माणसावर काही प्रथमच आलेली नाही; किंबहुना अशा घनघोर संघर्षामधूनच महाराष्ट्राची निर्मिती झाली.

21 नोव्हेंबर 1956 या दिवशी मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ 106 मराठी माणसांचं रक्त सांडलं म्हणून एक मे 1960 हा सोनेरी दिवस उगवला. मुंबईसह महाराष्ट्राची, मराठी भाषिकांच्या राज्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवरायांनी या मातीतल्या साध्या-भोळ्या माणसाला त्याच्या अस्मितेची जाणीव करून दिली आणि त्या जोरावर मराठ्यांनी पुढे अटकेपार झेंडे उभारले.

महाराष्ट्रानं संत घडवले आणि संतांनी महाराष्ट्र घडवला, असं म्हणतात. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असं सांगणार्या संतांनी या मातीत समतेचं बीज रोवलं. अंधश्रद्धा आणि भ्रामक समजुतींवर प्रहार करून खर्या श्रद्धेची ज्योत मनामनात जागवली. हाती घेतलेल्या कामात आणि काळ्या मातीत झिरपणार्या घामात सावळ्या विठुरायाचं दर्शन घडवलं. समतेच्या याच मशालीच्या उजेडात असंख्य समाजधुरिणांनी, राष्ट्रभक्तांनी आणि सुधारकांनी देशाला मोठी वैचारिक शिदोरी दिली. क्रांतिकारक आणि विचारवंतांची मोठी परंपरा महाराष्ट्रानं निर्माण केली. त्यांनीच महाराष्ट्राची जडणघडण केली. इथल्या महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश संपादन केलं आणि त्यासाठी स्त्रीशिक्षणाचा पाया याच महाराष्ट्रात घातला गेला.

चवदार तळ्याच्या सत्याग्रहानं या महाराष्ट्रात जातिअंताच्या लढाईला तोंड फुटलं. समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, संगीत, कला यापैकी कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र कधीच मागे पडला नाही. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आज लक्षावधी कुटुंबांचं पालनपोषण करते आहे. ग्रामीण भागात रुजलेल्या सहकाराच्या चळवळीनं ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ केली आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्रानं निर्माण केलेल्या विजयी परंपरेची आणि त्या परंपरा निर्माण करणार्यांची आज आवर्जून आठवण येते.

या राज्याचा साठावा स्थापना दिवस इतक्या तणावाच्या वातावरणात साजरा करावा लागेल, असं काही दिवसांपूर्वी आपल्याला वाटलंही नव्हतं. संपूर्ण जगभरात एक अक्राळविक्राळ राक्षस सूक्ष्मजंतूच्या रूपात वावरतो आहे. कोविड-19 नावाचा हा अज्ञात शत्रू कोणत्या अस्त्रानं संपुष्टात येईल, याविषयी जग अजून अंधारात आहे. आपल्याकडेही रुग्णांची संख्या वाढत असून, महाराष्ट्रातच कोविड-19 ची लागण सर्वाधिक लोकांना झाली आहे. राज्यातली रुग्णसंख्या 10 हजारांच्या घरात गेली आहे. लॉकडाऊनमुळं महिन्यापेक्षा अधिक काळ आपण सारे घरात अडकून पडलो आहोत. पण जगाला सध्या तरी याहून अन्य पर्याय सापडलेला नाही. ‘हे सगळं कधी संपणार,’ या प्रश्नाला कुणाकडेही ठोस उत्तर नाही. कोरोना विषाणूवर लस उपलब्ध व्हायला अजून बराच काळ लागणार आहे आणि संकटानं फास आवळून धरलाय.

धैर्य आणि संयमाची कसोटी पाहणार्या या काळात महाराष्ट्राचा स्थापना दिवस साजरा करताना आपल्याला इथं रुजलेल्या सर्व परंपरा आठवाव्या लागतील. शिवरायांचा गनिमी कावा आठवून युद्ध करावं लागेल. करोनाची कोंडी करूनच युद्ध जिंकता येणार आहे. मुख्य म्हणजे, आपल्याला या काळात अत्यंत सकारात्मक विचार करावा लागणार आहे. आपल्याला दररोज नव्याने दाखल होणार्या रुग्णांचे आकडे कळतात. रोज किती जण दगावले, याचा आकडा कळतो. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची आकडेवारी कळते. परंतु याबरोबरच आणखी एक आकडा आपल्याला नेहमी दिसत असतो आणि तोच आपण दुर्लक्षित करतो. तो आकडा म्हणजे, बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांचा.

या महाराष्ट्रात आजवर दीड हजार रुग्णांनी कोरोनाला पराभूत करण्यात यश मिळवलंय. रुग्णांच्या संख्येत भर पडत असली तरी मृत्युदरात घट होत आहे, ही चांगली लक्षणं आहेत. कोरोना विषाणूवर लस, नेमकी उपचारपद्धती आणि औषधं विकसित झाली नसली, तरी त्याला पराभूत करणं आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे, हे स्पष्ट झालंय. ज्यांना जुनाट आजार आहेत, हृदयविकार, हायपरटेन्शन, मधुमेह, स्थुलतेसंबंधी आजार आहेत, त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे, हेही स्पष्ट झालंय. त्यामुळं अशा रुग्णांची विशेष काळजी घेणं आपल्या हातात आहे. अशा व्यक्तींनी कोणत्याही अपरिचिताच्या किंवा प्रवास करून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. वृद्धांबरोबरच तरुणांनाही हा आजार होत असला, तरी तुलनेनं तरुण मंडळी या आजाराचा मुकाबला अधिक शर्थीनं करू शकतात. घरातल्या घरात माफक व्यायाम, शुद्ध आणि सात्त्विक आहार, स्वच्छता आदी गोष्टी पाळल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.

कोरोनाच्या या भीषण संकटाशी मुकाबला करण्यासाठी देशपातळीवर आणि राज्यपातळीवर बरेच प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा आजार पसरण्याचा वेग आणि संकटाची अनाकलनीयता लक्षात घेता, या प्रयत्नांना मिळणारं यश मर्यादित आहे. म्हणूनच कडक निर्बंधांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे आणि ते पाळण्यात हलगर्जीपणा होता कामा नये. हे निर्बंध आपल्या हितासाठीच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना विलगीकरणाचा सल्ला दिला आहे, त्यांनी तो पाळला पाहिजे. क्वारंटाइनचा शिक्का हातावर बसला म्हणजे आपला अपमान झाला असं मानता कामा नये. आपल्या जिवलगांच्या रक्षणासाठीच हे करावं लागलं आहे. या संकटाच्या काळातही घरदार वार्यावर सोडून अनेक सैनिक लढत आहेत. दारात सर्वेक्षणासाठी येणारी अंगणवाडी सेविका असेल किंवा आरोग्य विभागाचा कर्मचारी असेल, तो आपली तपशीलवार चौकशी करतो यामुळं वाईट वाटून घेण्याचं काय कारण? हा काही पोलिस तपास नव्हे! कोणतेही तपशील न लपवता माहिती देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यातच आपलं भलं आहे. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलिस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबीयांना भेटूही शकत नाहीत, याची जाणीव ठेवली पाहिजे.

आपला महाराष्ट्र आधुनिकतेच्या स्पर्धेतही देशात नेहमीच अव्वल राहिला आहे. औद्योगीकरण असो वा शेतीसुधारणा असोत, महाराष्ट्राची समृद्धी वाढतच राहिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीनं या संकटाशी दोन हात करीत आहेत. मुंबई-पुण्यासारख्या सर्वाधिक बाधित शहरांमधून अनेकजण आपापल्या गावी परतलेत. त्यांनी आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी काही पथ्यं पाळणं आवश्यक आहे. आपण आपल्या माणसांमध्ये येऊ शकलो, याबद्दल ही मंडळी समाधानी असतीलच; परंतु त्यांच्याकडून अधिक जबाबदार वर्तनाची गरज आहे. तरच आपण या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकू. लढवय्यांप्रमाणेच विवेकाचीही परंपरा सांगणार्या साठीतल्या तरुण महाराष्ट्रानं आजच्या घडीला देशासमोर नवा आदर्श उभा करायला हवा.

Deshdoot
www.deshdoot.com