वायूभय संपेना…
Featured

वायूभय संपेना…

Balvant Gaikwad

कुठंही वायूगळती झाली की, भोपाळच्या घटनेच्या आठवणी ताज्या होतात. देशात अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी घडलेल्या वायूगळतीच्या अनेक घटनांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्यामुळे कदाचित त्यावर चर्चा झाली नसेल. परंतु, विशाखापट्टणमच्या घटनेत स्टायरिन नावाच्या गोड वायूनं अनेकांच्या आयुष्यात आणलेली काळरात्र पाहता भविष्यात अधिक सावध राहावं लागेल.

– व्ही. त्यागराजन

दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीच्या विशाखापट्टणम प्रकल्पात वायूगळती होऊन 13 लोकांचा जीव गेल्यानं ही कंपनी एलजी (लाईफ इज गूड) नसून एलबी (लाईफ इज बॅड) असल्याचा अनुभव स्थानिक नागरिकांना आला आहे. विशाखापट्टमणच्या घटनेनं भोपाळमधल्या युनियन कार्बाईड कंपनीच्या 35 वर्षांपूर्वीच्या वायू गळतीच्या घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. तीन डिसेंबर 1984 ची काळरात्र भोपाळकर अजूनही विसरलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन भोपाळवासीयांसाठी अवघी 713 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. त्यातून बळी गेलेले 15 हजार नागरिक आणि एक लाख लोकांच्या वाट्याला किती मदत आली असेल, याचा विचार केला, तरी अशा तुटपुंजा मदतीतून काहीच साध्य होत नाही, हे लक्षात येतं. गेलेले जीव मदतीनं परत येत नाहीत. सरकारी आकड्यांपेक्षाही मृतांचा आणि वायूबाधितांचा आकडा फार मोठा होता, असं माध्यमं म्हणत होती. मदतीच्या बदल्यात कंपनीविरोधातले सर्व गुन्हे मागे घेण्यात आले होते. जगाच्या औद्योगिक इतिहासातली ही सर्वात मोठी दुर्घटना होती.

भोपाळमधल्या घटनेनंतरही देशात वायूगळतीच्या अनेक घटना घडल्या. मुंबईत शीवमधील क्लोरिन वायूची गळती, केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम कंपनीत झालेली वायूगळती, तारापूर परिसरात अनेकदा झालेली वायूगळती, डोंबिवलीतला हिरवा पाऊस, नगर जिल्ह्यातील कारखान्यामध्ये बायोगॅस प्रकल्पात झालेला कामगारांचा मृत्यू अशा किती तरी घटना सांगता येतील; परंतु त्यातून आपण आपत्ती व्यवस्थापनाचे काही धडे घेतले का, या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’, असंच येतं. भोपाळ आणि विशाखापट्टणम येथील दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे दोन्ही ठिकाणी वायूगळतीच्या घटना पहाटेच घडल्या. गाढ झोपेत असलेल्यांना पुन्हा श्वास घेता आला नाही. दोन्ही घटनांमधला फरक इतका, की भोपाळची घटना हिवाळ्यात घडली. त्यामुळे वायू शहरभर पसरला. युनियन कार्बाईड कंपनी शहराजवळ असल्यानं बाधितांची संख्या लाखामध्ये गेली, तर विशाखापट्टणममधली घटना उन्हाळ्यात घडल्यानं वायूगळतीचा परिणाम पाच किलोमीटर परिसरापुरता मर्यादित राहिला आणि लोकसंख्येची घनता कमी असल्यानं जीवितहानी कमी झाली.

युनियन कार्बाईड प्रकल्पातल्या विषारी मिथाईल आयसोसायनाइट वायूचा पाण्याशी संपर्क आल्यानं वायूगळती झाली. रासायनिक प्रक्रियेमुळे टाकीत दाब निर्माण झाला आणि ती उघडली. त्यातून वायूगळती झाली. केवळ तीन मिनिटांमध्ये या विषारी वायूनं हजारो लोकांचा बळी घेतला. धोक्याची सूचना देण्यासाठी कंपनीत असलेला भोंगाही त्वरित वाजला नाही. अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्यानं हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या, लोकांवर नेमके कोणते उपचार करायचे, याची कल्पना डॉक्टरांना नव्हती. मात्र, त्यानंतर दोन दिवसांमध्ये सुमारे 50 हजार लोकांवर उपचार करण्यात आले. असो. विशाखापट्टणम इथली दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपशील अजून बाहेर यायचा आहे. काही महिन्यांपूर्वीच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी गावात एका रसायनाच्या कंपनीत बॉयलरचे स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 15 पेक्षा अधिक कामगारांचा जीव गेला तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. वायूगळती, बॉयलरचे स्फोट आदींमुळे दरवर्षी कितीतरी बळी जात असतात. विशाखापट्टणम शहराजवळच्या एका रासायनिक प्रकल्पातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक जणांना वायूबाधा झाली. दाट लोकवस्तीच्या भागात ही कंपनी असती, तर वायूगळतीच्या बळींची संख्या कितीतरी पटीनं वाढली असती.

या वायूगळती प्रकरणानंतर मन विचलित करणारे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. काहीजण गाडीवरून जाताना अस्वस्थ वाटत असल्यामुळे खाली पडले तर काहीजण रस्त्यात उभे असताना बेशुद्ध पडले. हा रासायनिक प्रकल्प एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे. 1961 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प हिंदुस्थान पॉलिमर्सच्या मालकीचा होता. 1997 मध्ये त्याची मालकी दक्षिण कोरियाच्या एलजी या कंपनीकडे आली. भोपाळचा प्रकल्प अमेरिकन कंपनीचा होता तर विशाखापट्टणमचा प्रकल्प दक्षिण कोरियाचा आहे. टाळेबंदीनंतर कारखान्यात पुन्हा काम सुरू करण्यात आलं. कंपनीच्या आजूबाजूच्या गावातीले लोक गाढ झोपेत असताना गुरुवारी पहाटे 3 वाजता वायूगळती सुरू झाली. हे अनेकांच्या लगेच लक्षात आलं नाही; पण हळूहळू वायूगळतीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. स्टायरिनचा प्राथमिक उपयोग हा पॉलिस्टिरिन प्लॅस्टिक आणि रेसिन्स (राळ) बनवण्यासाठी होतो. स्टायरिन वायू हा रंगविरहीत किंवा हलकासा पिवळ्या रंगाचा असतो. हा एक ज्वलनशील वायू असून त्याला गोड वास येतो. बेन्झिन आणि इथिलीनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोअरिंग, टेबलवेअर आणि मोल्डेड फर्निचरमध्ये वापरण्यात येणार्‍या प्लॅस्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो.

हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणं, घशात घरघर, खोकला आणि फुफ्फुस जड होणं हे प्रकार होतात. हा वायू माणसाच्या संपर्कात जास्त प्रमाणात आला तर स्टिर्न सिकनेस होतो. यामुळे डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, चक्कर येणं, शौचात अनियमितपणा येण्याची लक्षणं आढळतात. यामुळे काहीवेळा हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि माणूस कोमात जाण्याची शक्यता वाढते. त्वचा स्टायरिन शोषून घेऊ शकते. अशी व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली तर केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करते तसंच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशाच प्रकारचा त्रास स्टायरिन वायू शरीरात गेल्यावरही होऊ शकतो. त्यामुळे त्वचा आणि डोळे जळजळ करतात. स्टायरिनमुळे ल्युकेमिया आणि लिम्फोमा होण्याचा धोका वाढतो असं साथीच्या रोगाचं संशोधन सांगतं. स्टायरिन लवकर आग पकडतं आणि आग लागल्यावर त्यातून विषारी वायू निघतो. या वायूगळतीच्या घटनेनं अन्य शहरांना सावध केलं आहे. गोव्यापासून कल्याण, डोंबिवली, पालघर, तारापूर, बोईसर, नागोठाणे, रोहा या शहरांपर्यंत अनेक ठिकाणी पसरलेल्या रासायनिक कंपन्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. या सर्वच कंपन्यांना आता सुरक्षिततेच्या उपाययोजनांची खातरजमा करावी लागणार आहे. ही पार्श्वभूमी पाहता स्टायरिन वायूमुळे या भागातल्या लोकांना किती संकटांना सामोरं जावं लागेल, याची कल्पना येऊ शकते.

एलजी कंपनीच्या प्रमुखांनी कामगार आणि आजूबाजूच्या नागरिकांना वार्‍यावर सोडलं जाणार नाही, असं सांगितलं असलं, तरी प्रत्यक्षात तसा अनुभव येईल, तेव्हाच लोक अशा संकटातून सावरू शकतील. वास्तविक घटनेनंतर कंपनीतल्या कामगारांना वायूगळतीचा त्रास अगोदर व्हायला हवा होता; परंतु तो गावकर्‍यांना आधी कसा झाला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ‘आमच्या कर्मचार्‍यांची आणि आजूबाजूच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेची काळजी आम्ही प्रशासनाच्या सहाय्यानं घेत आहोत,’ असं कंपनीचे प्रमुख एल. जी. केम यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेतली आहे. विशाखापट्टणममधल्या परिस्थितीबाबत केंद्रीय गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने चर्चा केली असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर भारतात रासायनिक उद्योग वाढीला लागले आणि ते प्रत्येक कारखानदाराच्या मनाप्रमाणे चालू लागले. ना त्यांना कोणते नियम ना कोणती शिस्त. त्यातूनच 36 वर्षांपूर्वी भोपाळ आणि आता विशाखापट्टणममध्ये दुर्घटना घडली. अर्थात भोपाळ दुर्घटनेनंतर भारत सरकारनं केलेल्या सर्व कारखान्यांच्या तपासणीअंती सुरक्षिततेच्या अंगाने कारखान्यांवर बरीच बंधनं आली आणि ती कामगार व आजूबाजूच्या वस्तीच्या दृष्टीनं काहीशी उपकारक ठरली. तरी देशात वायूगळतीच्या छोट्या-मोठ्या दुर्घटना घडतच असतात. अशा दुर्घटनांनंतर तरी आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे.

भोपाळ दुर्घटनेनंतर भारतात काही छोट्या औद्योगिक दुर्घटना घडल्या. त्यांना आपण ‘मिनी भोपाळ’ असं म्हणतो. विषारी रसायनं जमिनीत मिसळण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. आपल्याकडे अजूनही अनेक भागांमध्ये घातक कचरा आहे. या विषारी कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कुठलीही विश्वासार्ह पद्धत आपल्याकडे नाही. त्यातच आपण कचर्‍यावर कचरा निर्माण करत चाललो आहोत. विशाखापट्टणम दुर्घटनेसाठी आता जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्यास त्यातून इतरांना धडा मिळत असतो. भोपाळच्या बाबतीत मात्र दोषींना राजाश्रय मिळाला. त्यामुळे अपेक्षित कठोर शिक्षा होऊ शकली नाही.

विशाखापट्टणमच्या बाबतीत तरी या चुका सुधारण्यात यायला हव्यात. केवळ कंपनीला दोषी धरण्याऐवजी प्रदूषण नियंत्रण महामंडळ काय करत होतं, वेळच्या वेळी तपासण्या झाल्या नाहीत का, मॉक ड्रीलद्वारे आजूबाजूच्या गावकर्‍यांना प्रशिक्षण का देण्यात आलं नव्हतं, आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियम का पाळले गेले नाहीत, पाळले गेले असतील तर बाधित होणार्‍यांची संख्या इतकी का वाढली, दुर्घटना घडल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये वैद्यकीय उपचार मिळू शकतील, अशी व्यवस्था का नव्हती असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेतल्या पीडितांना भोपाळ दुर्घटनेप्रमाणे वार्‍यावर सोडता कामा नये. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जी कुटुंबं आता रस्त्यावर आली आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकार आणि कंपनीनं घ्यायला हवी.

Deshdoot
www.deshdoot.com