करोनाविरोधी लस कुठे आणि कधी ?

करोनाविरोधी लस कुठे आणि कधी ?

करोना विषाणूंमुळे त्रस्त रुग्णांच्या आणि या आजाराला बळी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विषाणूला रोखण्यासाठी देश-विदेशात संशोधने सुरू आहेत. शास्त्रज्ञ लस, औषध उपलब्ध करून देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. प्रभावी लस उपलब्ध होईपर्यंत विविध पर्याय धुंडाळले जात आहेत. करोना विषाणू नेस्तनाबूत करण्याबाबत जगभर सुरू असणार्‍या संशोधनांचा हा खास मागोवा.

डॉ. ज्ञानेश्वर अवचित

जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. या आजरावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र औषधनिर्मितीसाठी शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार होत आहे. इतर व्याधींवर वापरली जाणारी औषधे उपयुक्त ठरू शकतील का, याबाबत चर्चा सुरू आहेत. आजघडीला करोनाच्या जवळपास 70 लसींवर काम सुरू असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यापैकी तीन लसींची चाचणी माणसांवर घेण्यात आली आहे. हाँगकाँगच्या दोन संस्था लसनिर्मितीच्या प्रक्रियेत गुंतल्या आहेत. त्यांची लसनिर्मितीची प्रक्रिया दुसर्‍या टप्प्यात पोहोचली आहे. यासोबतच अमेरिकेतल्या दोन कंपन्याही लसनिर्मिती करत आहेत.

या दोन कंपन्यांच्या औषधांची चाचणी माणसांवर करण्यात आली आहे. अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजूनही करोना विषाणूचा प्रसार कमी झालेला नाही, म्हणूनच औषधनिर्मितीला पर्याय उरलेला नाही. भविष्यातला धोका लक्षात घेऊन लस तयार करण्याची प्रक्रिया खूप वेगाने सुरू आहे, कोणत्याही आजारावर लसीची निर्मिती केल्यानंतर ती बाजरात यायला 10 ते 15 वर्ष लागतात, पण करोना विषाणूची लस येत्या वर्षभरात बाजारात उपलब्ध व्हावी, यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी कंबर कसली आहे.

आरएनए म्हणजे रिबॉन्यूक्लेईक अ‍ॅसिड. चीनमध्ये करोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात या देशाने विषाणूचा आरएनए संपूर्ण जगापुढे खुला केला. यानंतर कोरोनाविषाणूच्या निर्मितीप्रक्रियेला वेग आला. क्वीन्सलँड विद्यापीठासह अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला. मेलबर्नमधल्या डोहेटी संस्थेत हा विषाणू विकसित करण्यात आला. करोनाविरोधातल्या लसनिर्मिती प्रक्रियेतले हे पहिले पाऊल होते. यानिमित्ताने चीनबाहेरच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच विषाणूच्या संरचनेची कल्पना आली. कोणत्याही लसीच्या निर्मितीला सर्वसाधारणपणे दोन ते पाच वर्षांचा काळ लागतो. मात्र सध्या संपूर्ण जग करोनाविरोधात लढा देत आहे.
सर्वजण एकत्रित प्रयत्न करत आहेत. । करोना विषाणूविरोधी लसनिर्मिती प्रक्रियेतल्या याआधीच्या त्रुटी, चुका लक्षात घेऊन काम सुरू असल्यामुळे नवी लस तुलनेने कमी काळात उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या लसनिर्मिती प्रक्रियेत सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

कोणत्याही एका संस्थेकडे औषधनिर्मितीची क्षमता किंवा सुविधा उपलब्ध नसतात. तसेच लसनिर्मितीचे अनेक टप्पे असतात. याच कारणामुळे सर्वांनी एकत्रितपणे काम करणे अधिक योग्य ठरतं. पारंपरिक प्रक्रिया अवलंबल्यास लसनिर्मितीला तब्बल 10 वर्षे लागू शकतात. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वांचे एकत्रित प्रयत्न यामुळे एक ते दीड वर्षात लसनिर्मिती होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. करोना विषाणूवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञ डीएनए किंवा आरएनएवर आधारित लसनिर्मितीच्या प्रयत्नात आहेत.

या लसींची निर्मिती प्रयोगशाळांमध्ये करता येते. या प्रक्रियेमुळे लसनिर्मिती अधिक वेगाने होऊ शकेल. हीच पद्धत भविष्यातल्या घातक विषाणूंविरोधातल्या लसनिर्मितीसाठी वापरता येईल. ही नवी प्रक्रिया अनेक अर्थांनी पथदर्शक ठरणार आहे. लसनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान इतरही संशोधने सुरू आहेत. अमेरिकेत एक औषध तयार करण्यात आले आहे. ईआयडीडी 2801 नावाचे हे औषध फक्त कोविड-19 वर नाही तर करोनाविषाणू गटातल्या प्रत्येक विषाणूवर प्रभावी ठरू शकेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोना विषाणूबाधित उंदीर आणि मानवी फुफुसांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. करोना या औषधामुळे फुफुसांचे नुकसान भरून काढता येतं.

अमेरिकेतल्या ज्ञानेश्वर अयाचित इमोरी विद्यापीठात याबाबत संशोधन करण्यात आले. हे औषध गोळीच्या स्वरुपात उपलब्ध करून देता येणार आहे. या औषधाला रिलिफ ड्रग असे नाव देण्यात आले आहे. हे औषध करोना विषाणूची लागण झाल्यानंतर 12 ते 24 तासांमध्ये काम करू लागते. करोना विषाणूमुळे होणारे फुफुसांचे नुकसान थांबवण्याची क्षमता या औषधामध्ये असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. माणसांवर या औषधाची चाचणी घेतली जाणार आहे. या औषधामुळे करोना विषाणूच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होते तसेच विषाणूच्या हालचाली रोखता येतात, असे सायन्स ट्रांजेशनल मेडिकल जर्नलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या औषधाच्या माणसांवरील चाचण्या यशस्वी ठरल्या तर करोना विषाणूविरुद्धच्या लढ्याला मूर्त स्वरुप येऊ शकते. या औषधाच्या चाचण्यांकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. करोना विषाणूवर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नसल्यामुळे इतर पर्यायी औषधे तसेच थेरपींचा वापर होतो. त्यापैकीच एक म्हणजे प्लाझ्मा थेरेपी. प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करायला भारताने परवानगी दिली आहे. अमेरिका तसेच चीनमध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. हे प्रयोग बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहेत.

प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्ण तीन ते सात दिवसात बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या थेरपीमध्ये करोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे बर्‍या झालेल्या व्यक्तीच्या रक्तातले काही प्लाझ्मा काढून करोनाबाधित रुग्णाच्या शरीरात सोडले जातात, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार बरा व्हायला मदत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरली तर भारताच्या कोरोनाविरोधातल्या लढ्याला अधिक बळ मिळू शकेल. औषधांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतही जागतिक आरोग्य संघटनेच्या या मोहिमेचा एक भाग आहे. इबोला या अत्यंत घातक अशा आजारावर मात करण्यासाठी रेमडेसिवीरची निर्मिती करण्यात आली होती.

आता हेच औषध कोविड-19 वर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. करोना विषाणूच्या गंभीर रुग्णांसाठी हे औषध लाभदायी ठरू शकते. अमेरिका, कॅनडा, युरोप आणि जपानमधल्या रुग्णांवर या औषधाचे प्रयोग करण्यात आले. रुग्णांनी या औषधाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांचे व्हेंटिलेटर्स काढून घेण्यात आले. करोना विषाणूंविरोधातल्या लढ्यात रेमडेसिवीरची भूमिका खूप महत्त्वाची असेल, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

मधल्या काळात बीसीजी लसीकरणाची बरीच चर्चा झाली. ही लस देणार्‍या देशांमध्ये करोनाचा प्रभाव तुलनेने बराच कमी असल्याचेही म्हटले गेले. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीसीजी लसीच्या वापराला आरोग्य संघटनेने पाठिंबा दिलेला नाही. बीसीजी लस करोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे । कोणतेही वैद्यकीय पुरावे उपलब्ध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतही बरेच तर्क लढवले जात आहेत. वटवाघुळांमध्ये करोना विषाणू शोधण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं आहे. दोन प्रजातीच्या वटवाघळांमध्ये हा विषाणू सापडला आहे. याला वटवाघूळ करोना असे नाव देण्यात आले आहे. मात्र वटवाघुळांमध्ये आढळणार्‍या या विषाणूची लागण माणसांना होण्याबाबतचे पुरावे आढळले नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एकीकडे संपूर्ण जग करोना विषाणूशी लढा देत असताना अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

लसनिर्मितीचे श्रेय घेण्यासाठी या देशांची धडपड सुरू आहे. आपल्या देशात करोना विषाणूविरोधी लसनिर्मिती सर्वप्रथम व्हावी, असे या तिघांनाही वाटत आहे. एकीकडे लाखो लोक कोविड-19 ला बळी पडत असताना अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष सुरूच आहे. मात्र अशा पद्धतीने संघर्ष करत राहण्यापेक्षा अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि करोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com