Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedखरी लढाई पुढेच आहे !

खरी लढाई पुढेच आहे !

सुरेखा टाकसाळ

कोरोना! करोना. ऐसे मत करोना, वैसे मत करोना ऐसे करोना… करोना व्हायरस निर्माण झाल्यापासून सतत करोनाचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि एकीकडे ‘काय करोना’ किंवा ‘काय करो ना’ यावर उपदेशाला कढ येत असताना दुसरीकडे वुहान प्रांतापासून ते वॉशिंग्टनपर्यंत, जपानपासून जर्मनीपर्यंत करोनाने जगभर थैमान घातले आहे. आजमितीला 193 देशांत मिळून 2 लाख 44 हजार लोक या नव्या संक्रमणाच्या जाळ्यात सापडले आहेत तर जवळपास दहा हजार मृत्युमुखी पडले आहेत.

चीनमध्ये सर्वाधिक (3 हजारांपेक्षा जास्त) करोनामुळे दगावले असून भारतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.भारतात करोनामुळे आजारी पडलेल्यांची संख्या सध्यातरी पुष्कळ कमी आहे. पण करोना संसर्गग्रस्तांची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे व जसजसे परदेशात अडकलेले भारतीय मुंबईत येतील तसतसा हा आकडा वाढणार हे निश्चित आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन-चार आठवड्यात बर्‍याच काही उपाययोजना करून करोना संसर्गाला नागरी-शहरी भागात आळा घालण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे.

- Advertisement -

परंतु खरी लढाई तर आता सुरू होणार आहे. वैद्यकीय सोयी-सवलतींनी सुसज्ज शहरी भागांचे तर ठीक आहे; परंतु ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांचे काय? तेथे तर साधी स्वच्छतागृहे, शौचालये किंवा प्राथमिक उपचार केंद्रेही नाहीत आणि जी आहेत ती असून नसल्यासारखी आहेत. देशातील सुमारे 60 टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यांचा या संक्रमणापासून बचाव कसा होणार?
चीनमध्ये तर करोना व्हायरसने एकेकाळची अभेद्य जाणवणारी व अवकाशातूनही स्पष्ट दिसणारी 21 हजार 193 कि.मी. लांबीची चिनी भिंतच लांघली नाही तर कम्युनिस्ट राजवटीचा लोखंडी पडदाही भेदला. इथे तर लोकशाही येता-जाता पलटी खाणार्‍या राजवटी/सरकारे आणि पारतंत्र्य झुगारून दिल्याच्या गुर्मीतून निर्माण झालेले व वाढतच चाललेले बेबंद, मुक्त छंद, ज्याची त्याची मनमानी! संक्रमण/ संसर्गाला आटोक्यात आणू शकेल अशी व एवढी शिस्त, एवढे सामाजिक भान कुठून येणार? साधे वाहतुकीचे नियम न पाळणारे अन् उलट दिशेला वाहन हाकण्यात फुशारकी मानणारे आम्ही! करोनाचा हल्ला कसा परतवणार? खास करून जेव्हा त्याला मारक शक्ती लस जगात कुठेही अजून तयार झालेली नाही? नाही म्हणायला शहरी भारतीयाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आहे. या भीतीमुळे असेल क्वचित, पण जबाबदारीने वागायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

तरीही करोना संसर्गग्रस्त काहीजण गर्दीत मिसळल्याचा, प्रवास करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे अन्य अनभिज्ञ लोकांना, प्रवाशांना संसर्ग होण्याचा व करोना मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा गंभीर धोका आहे. कोविड-19 किंवा करोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जग भयभीत आहे. या व्हायरसमुळे कुणाला कधी ‘राम’ म्हणावा लागेल, कोण कधी ‘अल्ला को प्यारा’ होईल, या भीतीने सर्वांना घेरले आहे. याआधी चिकन गुनिया, सार्स, स्वाइन फ्लूच्या साथींनीही सर्वांची झोप उडवली होती. पण या रोगांपेक्षा टी. बी. (क्षयरोग), हगवण यामुळे भारतात मरणार्‍यांच्या संख्येबद्दल कमी विचार केला आहे तुम्ही? हगवणीमुळे दररोज आपल्या देशात सुमारे दोन हजार जण मरण पावतात तर क्षयरोगामुळे दररोज बाराशेपेक्षा अधिक लोक अखेरचा श्वास घेतात.

इस्चेमिक हृदयविकारांमुळे जगात दररोज सुमारे 26 हजार जणांचा मृत्यू होतो. यामध्ये चार हजारपेक्षा जास्त जण भारतातील असतात आणि तसे पाहिले तर श्वसन व हृदयविकार, किडनी विकार, हगवण, मलेरिया, दमा इत्यादीमुळे देशात दरवर्षी लाखो भारतीयांचा मृत्यू होतो. हे सगळे सांगण्याचा उद्देश, करोनाच्या संकटाला कमी लेखणे हा मुळीच नाही. उलट आजार किंवा साथ कोणतीही असो त्याबाबत निष्काळजी राहता कामा नये. दुर्लक्ष न करता जबाबदारीने वागायला हवे. चीनमध्ये उदभवलेल्या करोनाच्या जागतिक प्रादुर्भावामुळे सर्व देशांमध्ये प्रचंड घबराट आहे. अमेरिका व स्पेनने आणीबाणी जाहीर केली आहे. कॅनडा-अमेरिकेने आपापल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. संपूर्ण इटली व चीनमध्ये 16 शहरे पूर्णतः ‘कुलूप बंद’ आहेत. चीनखालोखाल इटली, जर्मनी, फ्रान्समध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. भारतात या संसर्गाची सुरुवात होताच सरकारने त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या. भारताने आपली विमाने पाठवून चीन, इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुपरीत्या देशात परत आणले. इतर देशांच्या काही नागरिकांनादेखील ही सोय उपलब्ध केली. इराणमध्ये भारतीयांच्या करोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी तेथे प्रयोगशाळा स्थापन केली. तपासणीनंतर त्यांना देशात आणले व प्रयोगशाळा त्या देशासाठी ठेवली. या सर्व पुढाकाराबद्दल भारताच्या मानवीय सेवा आणि संवेदनशीलतेचे जगात सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.

देशातही सर्व महानगरे, मोठ्या शहरांमध्ये जागरुक करोनापासून बचाव व नियंत्रणासाठी वैद्यकीय व अन्य सेवा अत्यंत चौकस व तत्पर आहेत. विमानतळांपासून ते इस्पितळांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रवासी व अन्य संशयित रुग्णांची कसून तपासणी होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्यांना किमान 15 दिवस क्वारंटाईन किंवा अलगीकरण अनिवार्य आहे. अशी अलगीकरण केंद्रेही तातडीने सुरू केलेली आहेत. परदेशवारी करून आलेले काही प्रवासी व नागरिक स्वतःहून स्वतःला ‘अलग’ करून राहत असून आपल्या जागरुकतेचा परिचय करून देत आहेत. यात एक केंद्रीय राज्यमंत्री व पश्चिम बंगालमधील एका महिला खासदाराचाही समावेश आहे.चीनमधून करोनाच्या संदिग्ध भारतीयांना देशात परत आणल्यानंतर त्यांच्या अलगीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिल्लीत एका अलगीकरण केंद्राची गरज होती. सेना दलाने तयारी दर्शवली परंतु ती पुरेशी नव्हती. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) व हरयाणा पोलीस विभागाने मिळून 48 तासांमध्ये ती सोय मनेसर येथे उपलब्ध करून दिली. जवानांसाठी असलेल्या सहा मजली इमारतीत एक हजार खाटा व पाणी, स्वच्छतागृहे, स्नानगृहासहीत सुसज्ज अशा या केंद्रातून आतापर्यंत 742 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 47 दिवसांपासून डॉक्टर्स, नर्सेस व अन्य सेवक येथे अहोरात्र काम करीत असून एकदाही आपल्या घरी गेलेले नाहीत. अशाच सेवावृत्तीने पुणे व अन्य शहरातही डॉक्टर्स, नर्सेस कर्तव्य बजावत आहेत.

करोना व्हायरसच्या दहशतीमुळे जगात अनेक देशांत बाजार व्यवसाय, पर्यटनाला प्रचंड फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारतातही चित्र वेगळे नाही. सीबीएसी बोर्डाच्या 10 वी, 12 वीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या गेल्या. विद्यापीठांच्या परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. अनेक ट्रेन्स व हवाई उड्डाणे रद्द झाली. परदेशातून येणार्‍या फ्लाईटस्वर किमान 15 दिवस बंदी घालण्यात आली. पंजाब सरकारने राज्यात बस व ऑटोरिक्षासेवा बंद केल्या. राजस्थानमध्ये जमावबंदीचे 144 वे कलम लागू झाले. मुंबईत 50 टक्के सेवकांना घरून काम करण्याचे फर्मान राज्य सरकारने काढले. महाराष्ट्रात सिद्धिविनायक, शिर्डी तर काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी परवानगी नाही. मुंबईत हाजी अली व माहीम येथील दरगाहदेखील बंद केले गेले. आय.टी. व अन्य काही कंपन्यांच्या सेवकांना घरून काम करण्याचे आदेश जारी झाले. यात्रांवर बंदी, पर्यटनस्थळे, प्राणी संग्रहालये बंद, हॉटेल्स ओस पडली आहेत. यावरून करोनाच्या संकटाची गंभीरता लक्षात
घ्यायला हवी. करोनापासून बचाव व नियंत्रणासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारे आपापल्या परीने खबरदारीचे सर्व उपाय योजत आहेतच. पण संकट एवढे मोठे आहे की नागरिक या नात्याने आपल्यालाही जाणीव हवी आपल्या जबाबदारीची आणि संयमाची. सरकार, आरोग्य मंत्रालय, डॉक्टर्स यांनी दिलेल्या सूचना व सल्ले यांचे कसोशीने पालन हे करायला हवेच.

- Advertisment -

ताज्या बातम्या