जग गोत्यात, चीन नफ्यात

जग गोत्यात, चीन नफ्यात

चीनमध्ये माओ त्से तुंग यांच्या मृत्यूनंतर डेन शिओपेंग यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांनी चीनच्या विकासाचा आराखडा तयार केला. यामध्ये अत्यंत दूरदृष्टी ठेवून कोणत्या क्षेत्रात जग चीनवर विसंबून राहिल याचा विचार करुन औषधनिर्माण क्षेत्राचा विकास केला गेला. आज खरोखरीच औषधांसाठी संपूर्ण जग चीनवर अवलंबून आहे. कोरोनाच्या निमित्ताने याची प्रचिती आली आहे. आज वुहानमधून पसरलेला हा विषाणू जगापुढे महासंकट बनला असताना चीन औषध आणि वैद्यकीय उपकरणांची निर्यात करुन जबरदस्त नफा कमावत आहे. –

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

एकीकडे संपूर्ण जगावर कोरोना कोविड 19 या विषाणूजन्य संसर्गाचा दुष्परिणाम झालेला दिसून येतो आहे, जगभरात 7 लाखांपेक्षा अधिक लोक संसर्गग्रस्त झाले आहेत, 40 हजार लोकांचा या विकाराने मृत्यु झाला आहे, बचावात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन करुन लोकांना सक्तीने स्वतःच्या घरी बसवले जात आहे, देशातील सर्व उद्योगधंदे- व्यवहार ठप्प झाले आहेत, गोरगरिबांवर उपाशी मरण्याची वेळ येत आहे, जगभरातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडत आहेत…… आणि दुसरीकडे ज्या वुहानमधून या विषाणूचा उगम झाला तो चीन या प्रकोपापासून पूर्ण सावरल्याचे चित्र दिसते आहे. चीनमधील शहरे आता पूर्ववत स्थितीत येताना दिसू लागली आहेत. तेथील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. पर्यटन क्षेत्र खुले झाले आहे. देशांतर्गत विमानसेवा, रेल्वेसेवा खुल्या झालेल्या आहेत. उद्योगधंद्यापैकी जवळपास 80 टक्के उद्योग सुरू झाले आहेत. वुहानमध्ये चार-पाच दिवसांतू एखादा कोरोनाचा रुग्ण आढळतो आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जगाला कोरोनाग्रस्त करणारा चीन आता औषध निर्मिती करून आणि त्याची निर्यात करून अब्जावधी डॉलर्सचा नफा कमावतो आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभुमीवर दिसलेले हे चित्र नक्कीच विरोधाभासी किंवा विसंगत आहे. याचे कारण चीननेच जगाला या प्रचंड मोठ्या संकटाच्या गर्तेत ढकलणार्या महामारीच्या विळख्यात ढकलले. चीनमधून आलेल्या विषाणूचा पाहता पाहता सर्व जगात प्रसार झाला आणि आज जगभरातील बहुतांश देश आपल्या सर्व प्राथमिकता बाजूला ठेवून केवळ कोरोनाशी संघर्ष करताना दिसत आहेत. पण त्याच वेळी चीन मात्र त्याचे भांडवल करून अब्जावधी डॉलर्सचा नफा कमावतो आहे.

‘चोर तो चोर वर शिरजोर’ या उक्तीप्रमाणे चीनने आता ‘आम्हाला जगाला सावरायचे आहे’ अशी उदारमतवादी भूमिका घेत शेखी मिरवणे सुरु केले आहे. प्रत्यक्षात चीन औषधांची आणि वैद्यकीय साधनांची निर्यात करुन भरभक्कम नफा मिळवतो आहे. खास करुन युरोप आणि अमेरिका या दोन देशांना ही निर्यात केली जात आहे. मास्क, सॅनिटाझर्स, अतिदक्षता विभागातील महत्त्वाची साधने, हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स घालतात तेे वैयक्तिक सुरक्षिततेसाठीचे किट हे सर्व चीनमध्ये तयार होते आणि तिथूनच त्याची निर्यात होते. त्यामुळे आजघडीला कोरोनाचा सामना करण्यासाठी जी औषधे लागतात, वैद्यकीय साहित्य, उपकरणे लागतात या सर्वांसाठी संपूर्ण जग चीनवरच विसंबून आहे आणि चीन याचा पूर्णपणे फायदा घेत आहे. एकीकडे चीन आर्थिक नफा मिळवतो आहेच आणि जगावरील प्रभाव वाढवण्याचा प्रयत्नही करतो आहे.

वास्तविक, कोरोना या विषाणूचा जन्म कसा झाला, याविषयी अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये चीननेच हा विषाणू तयार केला असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत आहे. कारण वुहानमध्येच हा विषाणू मर्यादित होता. तेथे साडेतीन हजार लोक मरण पावले आणि 80 हजार लोकांना संसर्ग झाला. परंतू वुहानपासून 700-800 किलोमीटर दूरच्या शांघायसारख्या शहरामध्ये केवळ 7-8 रुग्णांचा मृत्यू झाला. शांघाय शहराची लोकसंख्या 3 कोटी आहे. व्यापारी राजधानी असलेल्या ह्या शहरात मुंबईपेक्षा लोकसंख्येची घनता अधिक आहे. असे असूनही शांघायमध्ये अत्यल्प लोकांचा मृत्यू कसा झाला? अशाच प्रकारे बीजिंगदेखील राजधानीचे शहर आहे, तिथेही लोकसंख्येची घनता मोठी आहे, परंतू बीजिंगमध्येही त्याचा प्रादुर्भाव झाला नाही. केवळ वुहान शहरापर्यंतच हा विषाणू मर्यादित कसा राहिला? याची ठोस आणि समर्पक उत्तरे चीनकडून मिळत नाहीयेत. त्यामुळेच चीनकडून जाणीवपूर्वक हा विषाणू पसरवण्याचा प्रयत्न केला गेला होता का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चीनचा यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तेथील साम्यवादी एकाधिकारशाही राजवटींपुढे एखादे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर त्यांच्या लेखी माणसाचे आयुष्य फार महत्त्वाचे नसते. उदाहरणच घ्यायचे तर, मागील काळात बीजिंगमध्ये तियांन मेन स्क्वेअरमध्ये शांततामय मार्गाने सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी चीनने त्यांच्यावर रणगाडे चालवले आणि त्यांना चिरडून मारून टाकले होते. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, साम्यवादाचा प्रभाव टिकवण्यासाठी चीनमधील हुकुमशहा कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. कोरोनाबाबत विचार करता, चीनने असे का केले असेल याचा विचार केला तर चीन हा अत्यंत महत्त्वाकांक्षी देश आहे. चीन त्याला ‘मिडल किंगडम थिअरी’ म्हणतो. म्हणजेच जगाच्या नकाशात चीन केंद्रस्थानी आहे आणि आम्ही जगाला नेतृत्व दिले पाहिजे अशी एक मोठी महत्त्वाकांक्षा चीनमध्ये आहे. या महत्त्वकांक्षेपोटी चीन सदैव तयारी करत असतो. परंतु अमेरिका असेपर्यंत ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही हे चीनला माहिती आहे. कारण चीनच्या तुलनेत अमेरिका प्रगत आहे. त्यामुळे चीनला अमेरिकेचा समोरासमोर सामना करणे, युद्धमार्गाने मुकाबला करणे शक्य नाही. शिवाय अंतराळ, सामरीक यांसारख्या क्षेत्रात अमेरिकेचा मुकाबला करणे चीनला शक्य नाही. त्यामुळे कटकारस्थानाच्या माध्यमातून अमेरिकेचे सामर्थ्य कमी करण्याचा प्रयत्न चीन करतो आहे असा दावा काही अभ्यासक करू लागले आहेत.

या अभ्यासकांनी काही साहित्याचे संदर्भही दिलेले आहेत. त्यानुसार, अमेरिकेचा सामना कसा करता येईल यासाठी चीनमधील लष्करी अधिकार्‍यांनी काही साहित्य निर्मिती केली होती. त्यामुळे अमेरिकेचे सामर्थ्य कमी करण्यासाठी चीनने हा विषाणू तयार केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी सार्ससारखा विषाणू चीनमधूनच आला होता. चीनमध्ये लोकशाही व्यवस्था नाही, पारदर्शकता नाही. चीनकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. उलट चीन माहिती लपवण्याच्या प्रयत्नात आहे. वास्तविक नोव्हेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रूग्ण दिसून येऊनही डिसेंबरपर्यंत काहीही उपाय केला नाही. त्याचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. मध्यंतरी चीनने माणसाकडून माणसाला हा संसर्ग होत नाही, असा खोटा दावा केला होता. विशेष म्हणजे त्याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली होती. त्यानंतर चीन आता कोरोनावर संपूर्ण नियंत्रण मिळवल्याचे दावा केला आहे आणि त्यालाही डब्ल्यूएचओने देखील मान्यता दिली. चीनने याविषयी जी काही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला त्याला डब्ल्यूएचओची मान्यता मिळत गेली. दरम्यानच्या काळात लोकांमध्ये संसर्गाचा प्रसार वाढत होता. चीनमधून दुसर्‍या देशात आणि दुसर्या देशातून चीनमध्ये असा लोकांचा प्रवास सुरूच होता, त्यातून युरोपात प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला. त्याचप्रमाणे अमेरिकेतही झाला. या सर्व गोष्टींमुळे चीनमध्ये निर्माण झालेला विषाणू जगात पसरला आणि चीन मात्र त्यावर विजय मिळवला असे चित्र दाखवतो आहे.

1980 च्या दशकापासून चीन अत्यंत शिस्तबद्धपणे विकसित झालेला आहे. 1980च्या दशकात माओ त्से तुंग यांच्या मृत्यूनंतर डेन शिओपेंग यांनी जेव्हा सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांनी चीनच्या विकासाचा आराखडा तयार केला. त्याला 20 ईअर्स डेव्हलपमेंट प्लान म्हणतात. या आराखड्यामध्ये सात-सात वर्षांच्या योजना होत्या. त्यानुसार चीनमध्ये शेती, व्यापार, उद्योग, संरक्षण याचा विकास केला गेला. अत्यंत दूरदृष्टी ठेवून कोणत्या क्षेत्रात चीनला प्राविण्य मिळवता येईल किंवा जग चीनवर विसंबून राहिल याचा विचार केला गेला. त्यानुसार औषधनिर्माण क्षेत्राचा विकास केला गेला. चीनने त्यात प्राविण्य मिळवले आणि आज खरोखरीच औषधांसाठी संपूर्ण जग चीनवर अवलंबून आहे. आज युरोपला निर्यात होणार्‍यांपैकी 80 टक्के औषधांचे घटक चीन तयार करतो. अमेरिकेचीही हीच गत आहे. त्यामुळेच आज अमेरिकेने आपली चीनविरुद्ध उगारलेली तलवार म्यान केली. सुरूवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे चीनच्या विरोधात भूमिका घेतली होती; परंतु ते आता चीनचे नाव घेतच नाहीत.

कारण चीनने औषध घटकांचा पुरवठा बंद केला तर कोरोना संपूर्ण अमेरिकेत पसरेल हे त्यांना ठाऊक आहे. हीच भूमिका युरोपनेही घेतली. केवळ अमेरिका, युरोपच नव्हे तर आज कोणताही देश चीनविरोधात तोंड उघडायला तयार नाही. भारताने राजनैतिक भूमिका घेत आम्हाला यात पडायचे नाही. भारत चीनला दुखावू शकतच नाही. कारण भारताकडेही 80 टक्के उपकरणे चीनमधूनच येतात. मास्क, पीपीके कीट चीनकडूनच येते आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये चीनमध्ये 8950 कंपन्यांनी मास्क बनवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक कंपनी जवळपास 60 ते 70 हजार मास्कची दररोज निर्मिती करते. भारताने या सर्वांबाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे ठरवले तरीही यासाठी तब्बल 6 महिने लागतील. तोपर्यंत कोरोनाचा मोठा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे आजघडीला चीनला दुखावून चालणार नाही हे भारत ओळखून आहे.
अशा प्रकारे चीनने अत्यंत शिस्तशीर पद्धतीने संपूर्ण जगाच्या नाड्या आपल्या हाती ठेवल्या आहेत. या नाड्या आवळून आता चीन अब्जावधी डॉलरचा नफा कमावतो आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com