मरकजने वाढवला धोका !

jalgaon-digital
3 Min Read

कोरोना महामारीने जगात थैमान घातले असून देशात कोरोना फैलवण्यास निजामुद्दीन मरकजचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. मरकजला हजेरी लावणार्‍यांत खान्देशचा वाटा मोठा असल्याचे उघड झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील लोकांचा सहभाग आहे. दोन दिवसांतील समोर आलेल्या माहितीने खळबळ तर माजली आहेच; पण प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे.

तबलिगी जमातहून परतलेले अनेक जण पॉझिटिव्ह होऊ लागले आहेत. निजामुद्दीन मरकजच्या धार्मिक कार्यक्रमाला जगभरातून लोक सहभागी होत असतात. पण या वर्षी चीनसह 67 देशांतील 2041 लोक येऊन गेले आहेत. जानेवारीपासून कोरोनाचा धोका उघड झाल्यावरही इतके विदेशी नागरिक दिल्लीत येतात, हजारो लोकांमध्ये ते सामील होतात आणि पुन्हा निघून जातात. याकडे मात्र दिल्ली आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचे लक्ष कसे गेले नाही किंवा त्यांना हा विषय गांभीर्याने घ्यावसा वाटला नाही? त्यांनी जर वेळीच दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.

तबलिगी जमातचे धार्मिक कार्य 1926-27 पासून सुरू आहे. पण गेल्या 20 वर्षांपासून दिल्लीतील मरकजही वादात सापडल्याचे आणि त्यांच्यावर यापूर्वी गंभीर आरोप झाल्याचे माध्यमातून चर्चेत आले होते. मरकजहून परत आल्यानंतर तेलंगणा, काश्मीरच्या लोकांच्या मृत्यूने मरकजचे कनेक्शन चर्चेत आले आहे. आता त्यातील अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोपाला पुष्टी मिळाली आहे. चीन येथून आलेल्या नऊ जणांनी ही लागण झाली आहे का? याचाही शोध घेतला जाणे गरजेचे ठरणार आहे.

भारतीयांसोबत विदेशी नागरिक निजामुद्दीनमधील बंगलेवाली मशिदीत एकत्र आले असताना दिल्लीतील गुप्तचर यंत्रणा इतकी गाफिल कशी? असा प्रश्न अनुत्तरित राहतो. मरकजहून परत आलेली मंडळी नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यांत पोहोचली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे उत्तर प्रदेशातील 97 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत; हीच परिस्थिती इतर भागातही होणार नाही कशावरून? निजामुद्दीन प्रकरणात राजकारण करण्याआधी निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणणे देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

अल्लाहने सांगितलेल्या धर्मोपदेशाचा प्रचार आणि प्रसार करणार्‍यांना तबलिगी म्हटले जाते व जमात म्हणजे समूह. मात्र, आजमितीला तबलिगीच्या माध्यमातून देशभर कोरोनाचा प्रसार झाल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आहे. मरकजचे मुख्य आयोजक मौलाना महम्मद साद हे फरार झाले आहेत, त्यांच्यासह 7 जणांविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. जगातील सुमारे 12 कोटी लोक तबलिगीशी संबंधित आहेत. जगातील 213 देशात तबलिगीचे कार्य पोहोचले आहे.

अशा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या या हरकती दुर्लक्ष करण्यासारख्या निश्चितच नाहीत. कुणी त्याचे समर्थनही करू नये. दिवसेंदिवस कोरोना रुग्णाचा आकडा धोकादायक आणि धक्कादायक आहे; हे नाकारता येत नाही. प्रश्न आहे तो खान्देशातील ही मंडळी किती लोकांच्या संपर्कात आली, याचा तत्काळ शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाइन करावे, इतकेच प्रशासनाला सुचवता येईल!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *