या बाबतीत भारतीय सारे समान !
Featured

या बाबतीत भारतीय सारे समान !

Balvant Gaikwad

उत्तर प्रदेशातील एका बेरोजगार शिक्षिकेचे (?) प्रकरण सध्या गाजत आहे. त्या एकाच नावाने त्या राज्यातील निरनिराळ्या शहरांतून 25 शिक्षिकांच्या नावे वेतन दिले गेले. किमान एक कोटीचा गंडा राज्य सरकारच्या गळक्या तिजोरीला घातला गेला. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तेथील शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच प्रगत महाराष्ट्र तरी मागे कसा राहणार ? नाशिकमध्येही नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांच्या सोसायटीतील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीला आले आहे.

सोसायटीत सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम आणि शिक्षकांचा नियमित पगार जमा होतो. ती रक्कम देण्यासाठी सोसायटीचा शाखा व्यवस्थापक आणि व्यवस्थापक शिक्षकांकडून लाच घेत असत. एका शिक्षकाने त्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा लावण्यात आला. त्यात त्या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. शिक्षकांची ही सोसायटी नेहमीच गाजत असते. वार्षिक सभा वादाने गाजतात. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिव्यांची लाखोली वाहणे, एकमेकांच्या गचांड्या धरून तब्येतीची खरपूस विचारपूस करणे, खुर्च्यांची फेकाफेक आणि कधी-कधी पायताणांचा प्रसाद एकमेकांना देणे असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. आता भ्रष्टाचारही उघड झाला आहे. दोघा व्यवस्थापकांवर कारवाई झाल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडल्याची चर्चा आहे.

तसे असेल तर शिक्षकांनी याआधी कधीच तक्रार दाखल का केली नाही ? सोसायटीचे व्यवस्थापक जिल्हा परिषद आणि मनपा शिक्षण मंडळाच्या माजी शिक्षणाधिकार्‍यांचे यजमान आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने शिक्षकांची काही कामे होत असावीत असेही आता बोलले जाते. किंबहुना त्यामुळेच या दोघांचा गैरकारभार शिक्षक चालवून घेत असतील का? अन्याय करणारा जितका दोषी तितकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो हे शिक्षकच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असतील? सोसायटीच्या सभेतील मारामारी आणि या दोन व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सहन करणार्‍या शिक्षकांनाही त्याबद्दल निर्दोष मानावे का? उत्तर प्रदेशातील शिक्षिका एकाचवेळी 25 ठिकाणच्या शाळेत शिकवत होती. या करामतीसाठी राज्याच्या शिक्षण खात्याने तिला एक कोटी रुपये वेतनही दिले.

शिक्षकच असे प्रकार करणार असतील तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील? कोणत्या प्रकारचे मूल्यशिक्षण देत असतील? सध्या चीन सार्‍या जगात आपले प्रभुत्व सिद्ध करू पाहत आहे. चीनच्या प्रगतीत तेथील शिक्षणव्यवस्थेचे यश सामावलेले आहे, असे म्हणतात. भारतात सध्या विद्यापीठांची रेलचेल आहे. देशभरात राज्य, केंद्रीय, खासगी आणि मानीव (डिम्ड) अशी मिळून थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल 907 विद्यापीठे आजघडीला कार्यरत आहेत. तशी नोंद विद्यापीठ अनुदान मंडळाकडे आहे. मात्र त्यापैकी एकाही विद्यापीठाचे नाव जगातील अव्वल विद्यापीठांच्या यादीत झळकताना आढळत नाही. त्याबद्दलची खंत अधून-मधून प्रसिद्धी माध्यमांवर शिक्षणतज्ञ व्यक्त करीत असतात. मात्र त्यापलीकडे फार काही घडत नाही. केंद्र-राज्य सरकारेही त्याबाबत गंभीर आढळत नाहीत.

तथापि दर्जेदार शिक्षणाची अवहेलना मात्र वाढतच आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे, असे नेहमीच बोलले जाते. प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत हीच रडकथा ऐकावयास मिळते. देशाच्या शिक्षणक्षेत्रात घडणार्‍या अशा गैरप्रकारांनी ते पुरेपूर सिद्ध होते. अशा स्थितीत पालकांनी तरी कोणत्याही अपेक्षा का कराव्यात? शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराचे लोण उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आले की इकडून तिकडे गेले? या बाबतीत तरी आम्ही सगळे भारतीय समान आहोत हे शिक्षकांनीच दाखवून द्यायचे ठरवले असावे. म्हणूनच पिढी-दरपिढी भारतीयांचे चारित्र्य उजळत असेल का? उत्तर प्रदेशात पंडित मदमोहन मालवीय हे नाव शिक्षणमहर्षी म्हणून एकेकाळी गाजत होते. बनारस विश्वविद्यालय हे त्यांनी प्रस्थापित केलेले विद्यापीठ जगभरात आजही प्रतिष्ठित मानले जाते. महाराष्ट्राला तर शिक्षणतज्ञांची फार मोठी परंपरा आहे. कदाचित ती उज्ज्वल नावे मराठी जनतेच्या मनातून कायमची पुसली जावीत, अशीही ताज्या दमाच्या शिक्षक-शिक्षिकांची महत्त्वाकांक्षा असेल का?

Deshdoot
www.deshdoot.com