अभिनंदनीय आणि अनुकरणीयसुद्धा !
Featured

अभिनंदनीय आणि अनुकरणीयसुद्धा !

Balvant Gaikwad

जगातील शेकडो देशांना ‘करोना’ महामारीचा विळखा पडला आहे. या अदृश्य शत्रूशी प्रत्येक देश आपापल्या परीने लढत आहे. मात्र जगातील महाशक्ती म्हटल्या जाणार्‍या अमेरिकेलाही या विषाणूपासून मुक्ती मिळवण्यात अद्याप यश आलेले नाही. जगाला धाकात ठेवणार्‍या अमेरिकेलाच आता धडकी भरली असेल. ‘करोना’शी झुंजताना फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इराण आदी विकसित देशांच्यासुद्धा नाकीनऊ आले आहे.

रुग्णसंख्येत दररोज भर पडत आहे. बळींची संख्याही वाढत आहे. काही-काही देशांतील रुग्णसंख्यावाढ मर्यादित झाली आहे, अशाही बातम्या अधूनमधून येतात. अशावेळी न्यूझीलंडने ‘करोना’वर विजय मिळवल्याची आणि हा देश ‘करोना’मुक्त झाल्याची दिलासादायक बातमी आली आहे. न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने तसे जाहीर केले आहे. 50 लाख लोकसंख्येच्या या देशात 1,500 लोकांना संसर्ग झाला होता. आता या देशातून ‘करोना’ हद्दपार झाला आहे. तेथील टाळेबंदीचे सर्व निर्बंध हटवण्यात येणार आहेत.

सर्वच संसर्गबाधित देशांनी आश्चर्यचकित व्हावे, असे अभूतपूर्व यश न्यूझीलंडने कसे मिळवले असेल? कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन करून त्याची योग्य अंमलबजावणी केली तर अशक्य गोष्टसुद्धा साध्य होते. न्यूझीलंडने तेच केले असावे. या यशात तेथील नागरिकांचे योगदान मोठे आहे. टाळेबंदी काळात सर्व नियम आणि निर्बंधांचे त्यांनी काटेकोर पालन केले असावे. न्यूझीलंडचे हे यश सरकार आणि जनतेच्या एकजुटीचा चमत्कार म्हणावा लागेल. ‘करोना’ला हरवण्यासाठी संसर्गबाधित देशांत टाळेबंदीचा मार्ग अवलंबला गेला, पण तो पर्याय अनेक देशांत फारसा उपयुक्त ठरलेला नाही. जगातील रुग्णसंख्येत अद्यापही दररोज वाढ होत आहे. टाळेबंदीने भारतातील संसर्गाचा आलेख खाली येणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही.

संसर्गवाढ वेगाने होण्यास अटकाव झाला असे सांगितले जाते, पण संसर्ग वाढतच आहे. शिस्तपालनात हलगर्जीपणा दाखवणार्‍या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येसारखीच लक्षणीय आहे. बेशिस्तीमुळे आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकारच्या प्रयत्नांचे यश मर्यादित होते. सर्वच देश कंबर कसून प्रयत्नशील असताना ‘करोना’चा पाडाव होण्याची पुरेशी चिन्हे अद्याप दिसत नाहीत. न्यूझीलंडने व आपल्या केरळ राज्याने ते साध्य करून दाखवले आहे. त्यांना जे जमले ते इतर देशांना का जमू नये? छोटा देश म्हणून या बाबतीत न्यूझीलंडचा सल्ला वा मार्गदर्शन घेण्यात शक्तिशाली देशांनी अजिबात कमीपणा मानू नये. कोणी सांगावे, कदाचित न्यूझीलंडचे मार्गदर्शन जगातील संसर्गबाधित देशांना सुटकेचा मार्ग दाखवू शकेल. नियोजनपूर्वक योग्य दिशेने जाणार्‍यांना यश नक्कीच मिळते.

संकटातही संधी शोधाव्या लागतात. त्यातून यशाचा नवा मार्ग सापडतो. गुजरातमधील उद्योजकांनी संकटातून संधी शोधून तिचे सोने केले. ‘करोना’ योद्यांसाठी लागणार्‍या ‘पीपीई’ किटची निर्मिती करून वाजवी दरात ते उपलब्ध करून देण्यात तेथील उद्योजक यशस्वी ठरले. आज देशातील बर्‍याच राज्यांत गुजरातमधूनच किट पुरवले जातात. अडचणीच्या काळातही व्यापार-उद्योग कसा वाढवायचा ते गुजरातमधील उद्योजकांनी यशस्वी करून दाखवले आहे. या यशाबद्दल असुया न बाळगता इतरांनी आपापल्या परीने प्रयत्न करायला कोण अडवते? संकटाचा बाऊ न करता संधीतून यशाला गवसणी घालता येते हा वस्तुपाठ गुजरातच्या उद्योजकांनी इतरांपुढे ठेवला आहे. न्यूझीलंडची ‘करोना’वर मात आणि गुजरातेतील उद्योजकांनी संकटाचे संधीत केलेले रुपांतर अभिनंदनीय आहेच, पण अनुकरणीयही आहे.

Deshdoot
www.deshdoot.com