Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedखुलेपणाच्या दिशेने वाटचाल !

खुलेपणाच्या दिशेने वाटचाल !

‘करोना’ संकटाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जगातील दोनशे देशांनी टाळेबंदीचा (लॉकडाऊन) मार्ग स्वीकारला. भारतात 25 मार्चपासून कालपर्यंत 68 दिवसांची टाळेबंदी चार टप्प्यांत करण्यात आली. चौथा टप्प्यानंतर पुढे काय? पाचवा टप्पा सुरू होणार का? होणार असेल तर त्या टप्प्यात किती मोकळीक मिळेल? कोणत्या गोष्टींना मुभा दिली जाईल? असे अनेक प्रश्न जनतेला सतावत होते. अखेर त्याची उत्तरे केंद्र सरकारने काल दिली. 1 जूनपासून महिनाभरासाठी टाळेबंदीचा पाचवा टप्पा सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली. त्याबाबतची मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आली आहेत.

या टप्प्यात ‘कंटेन्मेंट झोन’साठी सर्व प्रकारचे निर्बंध कायम राहतील. खरे तर टाळेबंदी उठवण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल. सव्वा दोन महिन्यांच्या टाळेबंदीमुळे देशात ‘करोना’ संसर्ग फैलावण्यावर बरेच नियंत्रण ठेवता आले. पहिल्या 10 बाधित देशांत भारत असला तरी अमेरिका, फ्रान्स, इटली आदी देशांच्या तुलनेत भारतातील संसर्ग कितीतरी आवाक्यात आहे याची साक्ष जागतिक आरोग्य संघटना आणि ‘वल्डोमीटर’ची आकडेवारी देत आहे.

- Advertisement -

‘देशात टाळेबंदी किती फायदेशीर ठरली?’ असा प्रश्न विरोधकांकडून केंद्र सरकारला विचारला जात असला तरी विरोधक वस्तुस्थिती नाकारू शकणार नाहीत. देशात ‘करोना’बाधितांची संख्या पावणे दोन लाखांपुढे सरकली आहे, पण 87 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या महाराष्ट्रात बाधितांच्या आकड्याने 60 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आणि देशात मुंबईतील रुग्णसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. तथापि विविध राज्यांकडून संसर्ग नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. ‘करोना’ला पराभूत करू शकतो हा विश्वास राज्यकर्त्यांना वाटत आहे. या लढाईत थोडेफार मतभेद असले तरी केंद्र आणि राज्य सरकारे परस्पर समन्वय राखून पुढे जात आहेत. राज्य सरकारांच्या सूचना आणि विचार केंद्र सरकारने वेळोवेळी जाणून घेतले गेले. त्यामुळेच देशातील संसर्ग आटोक्यात राहिला. टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने समाजातील सर्वच घटक आर्थिक आघाडी कमकुवत झाले आहेत.

करोडो श्रमिक आणि नोकरदारांच्या रोजगारावर गदा आली आहे. हातावर पोट असलेले छोटे व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार, सेवा क्षेत्रे अडचणीत आहेत. लोकांना घरातच स्वत:ला कोंडून घ्यावे लागले. टाळेबंदीची मात्रा आणखी जास्त काळ लांबवून चालणार नाही याची जाणीव देशातील आणि राज्यांतील सरकारांना झाली आहे. संसर्गाचा प्रभाव फार वाढून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचा अंदाज बांधून केंद्र सरकारने टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट दिली गेली. टाळेबंदीचा पाचवा टप्पा टाळे उघडणारा (अनलॉक) असून तो तीन टप्प्यांत आहे. पहिल्या टप्प्यात 8 जूनपासून शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे उघडली जातील. दुसर्‍या टप्प्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था तसेच कोचिंग केंद्रे सुरू होऊ शकतील.

तिसर्‍या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, रेल्वे, चित्रपटगृहे, जिम, जलतरण पूल, मनोरंजन पार्क, सभागृहे, सांस्कृतिक कार्यक्रम आदींना मुभा देण्याचा विचार होणार आहे. देशाच्या जखडलेल्या अर्थचक्राला चालना देण्यासोबत घरोघर बंदिस्त जनतेला मोकळा श्वास घेण्यास आणि जनजीवन सुरळीत होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरावा. ‘करोना’ला हद्दपार करण्याचे आव्हान पेलतानाच अर्थव्यवस्था सावरण्याची दुहेरी कामगिरी सरकारला बजवायची आहे. जास्तीत जास्त मोकळीक देण्यावर सरकारचा भर राहणार याचे संकेत मिळत आहेत. सरकारच्या या भूमिकेचे देशवासीय स्वागतच करतील. तरीही घराबाहेर पडताना मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर यांसारखे निर्बंध स्वत:ला घालून स्वयंशिस्त पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अन्यथा ‘करोना’चा विषाणू पुन्हा जोर केल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या