हीन ‘दीन’ पर्यावरण दिन !
Featured

हीन ‘दीन’ पर्यावरण दिन !

Balvant Gaikwad

आज जागतिक पर्यावरण दिन! जनतेत पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करावी या उद्देशाने ‘युनो’ संलग्न जागतिक संघटना वेगवेगळे ‘दिन ’ जाहीर करतात. वृत्तपत्रात छोट्यामोठ्या बातम्या झळकतात आणि दिन साजरा झाला हे वाचकांना कळते. तथापि माणसाच्या हिणकस कृतीमुळे आजचा पर्यावरण दिन खरोखरीच ‘दीन’ ठरला आहे.

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एका हत्तीणीची जाहीर झालेली करुण कहाणी सर्वांच्या हृदयात कालवाकालव करणारी आहे. ही घटना केरळचे वनाधिकारी मोहन कृष्णन यांच्यामुळे उघडकीला आली. हत्तीण भुकेलेली होती. भुकेने व्याकुळ होती. गरोदरही होती. अन्नाच्या शोधात ती एका गावात फिरत होती. तिला कोणीतरी फटाकड्यानी भरलेला अननस खाऊ घातला. हत्तीणीने तो खायचा प्रयत्न करताच अननसातील फटाके तिच्या तोंडात फुटले. त्यामुळे तिच्या तोंडाला गंभीर इजा झाली. जीभ फाटली. जखमांनी व्याकुळ होऊन हत्तीण सैरावैरा धावत सुटली. वाटेत आलेल्या कोणालाही तिने इजा केली नाही. कशाचीही नासधूस केली नाही. धावता धावता तिला नदी दिसली. नदीत जाऊन सोंड पाण्यात बुडवून ती शांतपणे उभी राहिली.

ही घटना कोणीतरी वनविभागाला कळवली. वनाधिकारी मोहन कृष्णन आपल्या सहकार्‍यांसह तिथे पोचले. त्यांनी हत्तीणीला पाण्याबाहेर काढायचे सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यासाठी दोन हत्ती देखील नदीपात्रात सोडले. पण हत्तीण पाण्याबाहेर आली नाही. वनविभागाच्या प्रयत्नांना प्रतिसाद न देता तिने जलसमाधी घेतली. तिच्या शवाचे पोस्टमार्टेम झाले तेव्हा ती गर्भवती होती हे उघड झाले. कृष्णन यांनी ‘माफ कर बहिणी’ असे म्हणून त्या हत्तीणीची माफी मागितली.

ही करुण घटना दुर्दैवाने जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला उघडकीला आली आहे ती कृष्णन यांनी या घटनेला वाचा फोडली म्हणून! अन्यथा मुके जनावर मेले या घटनेची त्याची दखल तरी कोण घेणार होते? गर्भार हत्तीणीला फटाकडे खाऊ घालणारा माणूस हिंस्त्र म्हणावा एवढा शब्द या दुष्टपणाला पुरेसा ठरेल का? आणि माणूस म्हणवणार्‍या प्राण्याने तो करावा यापरते दुर्दैव कोणते? माणुसकीला काळिमा फासणार्‍या अशा अनेक घटना जगात सर्वत्र घडतच असतील. आणि तरीही माणसातील दुष्ट प्रवृत्ती जागतिक संघटनांच्या कुठल्याही प्रयत्नांनी संपुष्टात येऊ शकत नाहीत याचे केरळमधील घटना हे एक ठळक उदाहरण आहे.

ज्या वनाधिकार्‍याने हा प्रकार पाहिला त्याचे हृदय कळवळले हे त्या हत्तिणीचे नशीब! एरवी अनेक जीव केवळ हिंस्त्र समजले जातात म्हणून माणसांच्या हातून मारले जातच आहेत. आणि तरीही माणसाला अहिंसेचे तत्वज्ञान पिढ्यानपिढ्या शिकवले जात आहे. कोणतेही तत्वज्ञान माणसाला माणूस बनवण्यासाठीच निर्माण झाले. पिढ्यानपिढ्या त्याचे वाचन, मनन, चिंतन माणसे करतच आहेत. काहींमध्ये बदलही होतो. पण तो अजून किती मर्यादित आहे याचे भान हत्तीणीची हत्या करणाराला मात्र नसावे. याचा एक वेगळा अर्थही असू शकेल का? माणसे सुशिक्षित झाली, सुसंस्कृत झाली असे म्हंटले जाते. पण अकारण कोणत्याही जीवांची हत्या करणार्‍या घटना प्रत्यही घडतच राहतील तर तो सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा माणसाच्या मूळ स्वभावातील हिंसक प्रवृत्तीला आळा घालू शकत नाहीत असाही वेगळा निष्कर्ष निघू शकेल का? तरीही माणसे राष्ट्र किंवा देश बनवतात. त्या

देशांच्या संघटना उभ्या करतात.तर्‍हेतर्‍हेचे जागतिक दिन जाहीर करतात. ते साजरे झाल्याच्या बातम्याही माध्यमे उत्साहाने प्रसिद्ध करतात. जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला एखाद्या हत्तीणीची अकारण हत्या करतात आणि तरीही आपल्या माणुसकीची जाहिरात करतच राहतात. पण हिंसा हा जगातील अनेक प्राण्यांचा धर्म आहे तितकाच किंबहुना त्या सर्वांपेक्षा मनुष्यप्राण्याच्या सुद्धा मूलभूत स्वभाव असावा असा एक हिंसक निष्कर्ष या घटनेतून निघू शकतो का? याच मूलभूत प्रवृत्तीमुळे माणसाने तयार केलेली राष्ट्रे सूक्तासूक्त सबबी शोधून एकमेकांवर आक्रमण करत राहात असावीत का? ‘वसुधैव कुटुंबकम’ चा हवाला देणारा भारतसुद्धा शेजारच्या हिंदू नेपाळाकडून व बौद्ध धर्माचा उद्घोष करणार्‍या चीनकडूनही संकुचित राष्ट्रवादाने वेढला जात आहे का?

Deshdoot
www.deshdoot.com