Featured

लोकांचा भक्तिभाव मोठा की देवाचा व्यापार ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

लॉकडाऊनचे निर्बंध थोडेसे सैल झाले. ताबडतोब गणपतीच्या मूर्ती बनवणार्‍या कारखान्यांतील काम सुरु झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सार्वजनिक गणेशोस्तव मोठ्या प्रमाणात साजरा होणार का? गणपती मूर्तींच्या उंचीबाबत सर्वमान्य तोडगा निघेल का? अशा मुद्यांवर मतमतांतरे व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने विचारात घ्यावी, अशी सूचना उत्सवांशी संबंधित एका प्रभावशाली व्यक्तीने केली आहे.

कोरोना काळात उत्सव साजरा करण्याचे नियम आणि निर्बंध काय असावेत? या संदर्भात सरकारने निश्चित धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी केली आहे. उत्सव साधेपणाने साजरा करण्याची अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. लालबागसह पुणे-मुंबईमधील अनेक सार्वजनिक गणपतींना अनेक वर्षांच्या परंपरेने वेगळाच लौकिक प्राप्त झालेला आहे.

तो वाढवण्यासाठी दरवर्षी नवेनवे उपक्रमही काही गणेशोत्सव मंडळे करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात लाखो लोक मंडळांच्या लौकिक प्राप्त गणपतीचे दर्शन घेतात. गर्दी जमते तिथे दिसलेच पाहिजे हा शिरस्ता राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा नियमाने पाळतात व भक्तिभावाने दर्शनाला पोहोचतात. केवळ दहा दिवसांसाठी स्थानापन्न झालेले गणपती अनेकांच्या नवसाला पावतात, अशी त्यांची प्रसिद्धी झालेली आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात अनेक जण नवस आपापले नवस फेडतात. माध्यमात उल्लेख होतो म्हणून मोठ्या प्रमाणावर देवाला दानही देतात.

काही गणपतींची उत्सव काळातील उलाढाल काही कोटी रकमेची होते. ते हिशेबही नंतर वृत्तपत्रात छापून आणले जातात. लालबागचा गणपती अशा प्रसिद्ध गणपतींपैकी सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच उत्सव मंडळाच्या सचिवांनी केलेली मागणी त्यामुळे महत्त्वाची ठरते. काही गणेशोत्सव सुप्रसिद्ध आहेत. तसे काही कुप्रसिद्ध सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतीच्या मंडपातच इतरही काही उद्योग चालू असतात. ‘नाल’ नावाचा जुगार तर कार्यकर्त्यांमध्ये बराच प्रिय आहे.

जमलेल्या वर्गणीतून कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहाराचे लोकप्रिय उपक्रमसुद्धा गाजत असतात. ते सर्व लक्षात घेता मंडळांच्या कार्यपद्धतीसाठी नियमावली असावी, काही धोरण असावे ही परब यांची सूचना दुर्लक्ष करण्यासारखी नाही. मंडळाच्या दानपेटीत जमा होणार्‍या दानाच्या रकमेपेक्षा कितीतरी मोठी आर्थिक उलाढाल ‘नाल’ व तत्सम उद्योग व्यापारात होत असते. मंडळ जेवढे मोठे तेवढा धंदाही मोठा आणि तेथे कार्यकर्ते म्हणून सहभागी होणार्‍यांचा रुबाब किती लक्षवेधक असतो हे दर्शनार्थींना सहज जाणवते.

लालबागसारख्या काही मंडळांचा अपवाद सोडला तर इतर कितीतरी मंडळे या उलाढालीचा हिशेब तरी देतात का? व्यवस्थित जमाखर्च ठेवला जातो का? मिळालेल्या दानाच्या रकमांचा विनियोग कसा होतो? त्यावर कुणाचे नियंत्रण असते? परकीय राजवटीच्या काळात राजकीय आंदोलनांची वैचारिक भूमिका लोकांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप कोणती विधायक विचारधारा अनुसरते? तशी काही निश्चित धोरणे असावी की, असू नयेत याची नव्याने मांडणी होणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक चांगल्या प्रथांना काळ जातो तसतसे विकृत स्वरूप येत जाते. हल्लीच्या गणेशत्सवाचीसुद्धा त्या दृष्टीने फेरमांडणी होण्याची गरज स्वप्निल परब यांच्या मागणीतून स्पष्ट होते.

समाजात वाढत जाणार्‍या समृद्धीसोबत देशातील अनेक देवस्थानांचेसुद्धा दिवस पालटले आहेत. अनेक देवस्थानांची उलाढाल अगदी व्यापारी पद्धतीवर होत असते. देवाला व्यापारातील साहित्याचे स्वरुप यावे का? हाही प्रश्न यानिमित्ताने जाणत्यांनी विचारात का घेऊ नये? भोळ्या समाजाच्या श्रद्धा आणि भक्तिभावाचा अयोग्य रीतीने लाभ घेणारे काही समाजघटक जागोजागी तयार झाले आहेत. नव्याने देवस्थाने किंवा धार्मिक स्थळे समृद्ध होत आहेत. तसे त्याचा व्यापार करून हात धुऊन घेणारे घटकही दिवसेंदिवस वाढत आहेत.

भोळ्यांच्या भक्तिभावानेच काही रामरहीम आणि आसारामसुद्धा समाजात निर्माण होत आहेत. या सर्व गंभीर प्रश्नांची उकल करण्यासाठी श्री. स्वप्नील परब यांच्या सूचनेनुसार विचार व्हावा. जीवनपद्धती बदलत आहे. त्याच्या अनुरूप अशा रीतीने धार्मिक उत्सवांची पुनर्मांडणी होणे हे प्रगत समाजाचे आवश्यक कर्तव्य नाही का?

Deshdoot
www.deshdoot.com