Friday, April 26, 2024
HomeUncategorizedबिबट्या पुराण !

बिबट्या पुराण !

गेले दोन-तीन दिवस नाशिककर सतत बिबट्या पुराण ऐकून गडबडले आहेत. बिबट्या शहरात आला. येता येता त्याने एक हॉटेल आणि एका रुग्णालयाला भेट दिली. तसे सिसिटीव्हीवरही दिसले. नंतर त्याने इंदिरानगर परिसरात काहींना दर्शन दिले. या परिसरात त्याला संघर्षही वाट्याला आला. त्यात दोन जण जखमी झाले. पण नंतर बिबट्या कोठे अदृश्य झाला हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.

बिबट्या कुठे गायब झाला या भीतीने किंवा चिंतेने सगळेच हैराण झाले. आपल्या परिसरात आला तर? या भीतीच्या कल्पनेने अनेकांनी दोन दिवस इमारतीच्या गच्चीवर जाणे देखील टाळले. माणसे सकाळी फिरायला जरा उशिराच बाहेर पडली. या घटनेकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. काही जण भीतीने बघतात तर काही कौतुकाने ! जे जखमी झाले त्यांचे काय बोला ! ते प्रत्यक्ष अनुभवाने भेदरलेले आहेत. मात्र अगदी मोजके वन्यजीव प्रेमी या घटनेकडे संवेदनशीलतेने पाहून आपापली मते मांडत आहेत. बिबट्या आला आणि गेला पण त्याचे कवित्व अजून काही दिवस सुरूच राहील. बिबट्या आणि माणसांमधील संघर्षाच्या घटना किंवा बिबट्याने अचानक दिलेली भेट या घटना नाशिककरांना नवीन नाहीत. याआधीही अनेकदा असे घडले आहे. वनाधिकार्‍यांनी अशा घटनांवर प्रकाश टाकला आहे.

- Advertisement -

बिबट्याला पकडणे हे वनखात्याचे काम आहे. तथापि त्यांच्या मताप्रमाणे बिबट्या हा हिंस्त्र प्राणी नाही. माणूस जसा बिबट्याला घाबरतो तसाच किंबहुना त्याहूनही जास्त बिबट्याच माणसाला घाबरतो. बबत्या माणसाला पहिल्यांदा दिसतो तोपर्यंत बिबट्याने कदाचित अनेकदा माणसांना पाहिलेले असू शकते. बिबट्या दिसला की माणसे गर्दी करतात. आरडाओरडा करतात. हातात काठ्या-दगड घेऊन त्याचा पाठलाग करतात. ते संकट वारंवार अनुभवलेला बिबट्या माणसाचे मन कसे ओळखणार? माणूस केवळ स्वसंरक्षणाच्या कल्पनेने बिबट्याला पळवून लावून बघतो. हे बिचार्‍या बिबट्याला कसे कळावे? कोणी दगड मारला तर एखादे कुत्रे देखील माणसाला चावण्याचा प्रयत्न करते. तर माणसांच्या गर्दीने घेरला गेलेला बिबट्या देखील आत्मरक्षणासाठीच जीवाच्या आकांताने पळू लागतो. ज्याच्यामुळे त्या प्रयत्नात अडथळा येतो त्यांना बिबट्याचे चावे सहन करावे लागतात. हे माणसांच्या लक्षात येत नाही.

बिबट्या दिसला की गर्दीने त्याचा पाठलाग करण्याचा मोह माणसे टाळू शकत नाही. उभयपक्षी ही मानसिकता फक्त माणसालाच समजू शकेल. पण तसे होत नाही. बिबट्या म्हणजे सुद्धा वाघाच्या वर्गातील हिंस्त्र प्राणी ही चुकीची कल्पना माणसाने विसरल्याशिवाय बिबट्याची वाटणारी भीती कमी होणार नाही. परिणामी बिबट्याचा पाठलाग आणि त्याची प्रतिक्रिया हे चित्र यापुढे कसे थांबवणार? दिवसेंदिवस जंग्ल कमी होत आहे. शहरे बेसुमार वाढत आहेत. त्यामुळे जंगलात वावरणार्‍या श्वापदांच्या वसतिस्थानांचा सुरक्षितपणा धोक्यात येत आहे. बिबट्यासारख्या तुलनेने कमी हिंसक प्राणी जमाती सुद्धा जंगलात वास्तव्य करतात.

जंगल कमी झाल्यामुळे ते प्राणी नव्या आश्रयस्थानाच्या शोधात बाहेर पडतात. पण माणसाच्या मनातील बिबट्याबद्दलची प्रतिमा बदलत नाही. ही कारणमीमांसा वनखात्यात काम करणार्‍यांना कितीही योग्य वाटली तरी बिबट्याचे निरुपद्रवीपण अजुन जनतेला पुरेसे उमजलेले नाही. मुंबई शहराबाहेर अनेक फार्महाऊसेस शहरी धनिकांनी बांधून ठेवली आहेत. मात्र वर्षानुवर्षे ती रिकामीच असतात. साहजिकपणे बिबट्यासारख्या तुलनेने कमी हिंसक जनावरांचा वावर तिकडे वाढतो. अनेक बिबटे तर अशा घरांच्या वर्‍हांड्यात किंवा सुरक्षित कोपर्‍यात जन्म घेतात. आसपासच्या शेतीमध्ये उभ्या पिकातही त्याचा वावर वाढतो. तिथे माणसेही दिसतात. असे बिबटे पाळीव प्राण्यांसारखे माणसाळू शकतात. हे सगळे बिबट्या पुराण ऐकताना आकर्षक वाटते.

तथापि पिढ्यानपिढ्या डोक्यात निश्चित झालेली काही प्राण्यांची कल्पनाचित्रे आणि त्यांचे काही काल्पनिक व काही वास्तव माणसाच्या मनातील भीतिचे दडपण दूर करू शकत नाही. अलीकडे प्रत्येक शहरात गावात सर्पमित्र आढळतात. नागासारख्या भीतीदायक बापालाही ते सहज खेळवतात. ते दृश्य बघणारी माणसे मात्र सापापासून दूर राहणेच पसंत करतात. भीतीचा असाच पगडा बिबट्याच्याही वाटायला येतो. आणि बिबट्या पुराणाचे नवनवे अध्याय गावागावात प्रसारित होतात. सध्या तर माणसे करोनाच्या भीतीने धास्तावलेली आहेत. नेमक्या याच काळात नागरी वस्तीत फरफटका मारू पाहणार्‍या बिबट्यासारख्या निरुपद्रवी (?) प्राण्याबद्दल वनाधिकार्‍यांनी वाचलेली गीता वास्तव असेलही तरी लोकांना वाटायला सध्या तरी कठीण वाटते.

- Advertisment -

ताज्या बातम्या