सीमा सुरक्षेकडे दुर्लक्ष नको !

सीमा सुरक्षेकडे दुर्लक्ष नको !

लडाखमध्ये चीन आणि भारता दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. तणाव कमी करण्यास सहकार्य करण्याऐवजी चीनने अडवणुकीचे धोरण स्वीकारले आहे. करोनामुळे देशासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीचा चीन गैरफायदा घेण्याची दाट शक्यता आहे. देशाने सावध राहावे असा इशारा सैन्यदलातून निवृत्त झालेल्या अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी वारंवार दिला आहे. त्याची दखल संबंधित घेतीलच. तशा बातम्याही रोज झळकत आहेत. तथापि सीमेवर तणाव का वाढला? देश करोनाशी लढत आहे. त्याचवेळी देशात अनेक मोठमोठी कामे सुरु आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तराखंडमधील चंबा बोगद्याचे दूरस्थ पद्धतीने कालच उद्घाटन केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चारधाम परियोजना राबवत आहे. त्या अंतर्गत ऋषिकेश-धारासू-गंगोत्री या मार्गावर 440 मीटर लांबीचा नवा प्रचंड चंबा बोगदा बांधण्यात आला आहे. या मार्गावरील एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी यापूर्वी तास-दीड तास लागत असे. चंबा बोगद्यामुळे तेच अंतर 10 मिनिटात पार करता येईल असे प्राधीकरणाने स्पष्ट केले आहे. बोगद्याचे काम सीमा मार्ग प्राधिकरण ( बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन किंवा बीआरओ ) या लष्करी विभागातील संस्थेने केले आहे. या कामाची अनेक वैशिट्ये प्राधिकरणाने माध्यमांना सांगितली.

बोगद्याचे काम नियोजनाप्रमाणे ऑक्टोबर 2020 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि हे काम चार महिने आधीच पूर्ण झाले आहे. चंबा गावातुन जाणारा हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. हा बोगदा बांधताना चंबा गावातील ग्रामस्थांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेतली गेली. बोगदा चंबा गावाच्या खालून बांधला गेला आहे. काम सुरु असताना सुद्धा गावचा बाजार नित्याप्रमाणे सुरु होता. तेथील भूसंपादन जिकिरीचे होते. हलक्या दर्जाची जमीन, झिरपणारे पाणी आणि देशात सुरु असलेला लॉकडाऊन अशा अनेक समस्यांचा सामना सीमा मार्ग प्राधिकरणाला करावा लागला. या आव्हानांवर मात करून सीमा मार्ग पप्राधिकरणाने विक्रमी वेळेत या बोगद्याचे बांधकाम पुरे केले आहे. हे काम किती अवघड असेल याची कल्पनाच करावी.

मुले- माणसे समुद्रकिनारी रेतीचा किल्ला बनवतात. खेळातील तो किल्ला बनवताना सुद्धा ओली रेती पुनःपुन्हा निसटत राहते. किल्ल्याचे बांधकाम पुनःपुन्हा ढासळते. प्रचंड मोठमोठ्या बांधकामात अडचणी सुद्धा तितक्याच प्रचंड असतात. सीमा मार्ग प्राधिकरणाने अशा किती अवघड समस्यांना तोंड दिले असेल ते त्यांनाच ठाऊक ! आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी अशी बहुतेक भारतीयांची महत्वाकांक्षा असते. कुटुंबीय एकत्र बसतात त्या त्या वेळी त्या यात्रेची स्वप्ने रंगवली जात असतील. या नव्या बोगद्यामुळे चारधाम यात्रिकांची यात्रा बरीच सुखद होईल. केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री हा 251 किलोमीटरचा नवा महामार्ग जानेवारी 2021 ऐवजी ऑक्टोबर 2020 पर्यंतच पूर्ण होण्याची शक्यता बोगद्याच्या यशस्वी कामामुळे प्राधिकरणाने अधिक आत्मविश्वासाने वर्तवली आहे.

सीमा मार्ग प्राधिकरणाचे हे काम कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. देशात लॉकडाऊन सुरु आहे. बहुतांश राज्यात अद्याप व्यवहार मर्यादित प्रमाणात सुरु आहेत. अशा काळातही आव्हानांवर मात करून काम पुर्ण करण्याच्या देशाच्या क्षमतेचा जगाला परिचय झाला आहे. ही भारतीयांसाठी अत्यन्त अभिमानाची बाब आहे. पण अशा विधायक कामांचा जोर वाढत असताना देशाच्या सीमा असुरक्षित राहू नयेत, देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता सम्बंधीतांकडून घेतली जाईल अशी जनतेची अपेक्षा आहे.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com