कौतुकास्पद सामाजिक जाणिवेचे दर्शन !
Featured

कौतुकास्पद सामाजिक जाणिवेचे दर्शन !

Balvant Gaikwad

सामाजिक शिस्त आणि सरकारने घालून दिलेले निर्बंध समाजाने पाळले तर करोनाशी सुरु असलेली लढाई कदाचित थोडीशी सोपी होऊ शकेल. राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हळूहळू का होईना सरकारने त्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. आता करोनापासून स्वतःला सुरक्षित राखायचे असेल तर सामाजिक शिस्त आणि सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळणे ही जनतेची जबाबदारी आहे ती जाणीव समाजात वाढत आहे असे समाधानकारक चित्र काल सर्वत्र दिसले. काल रमझान ईद सर्वत्र साजरी झाली.

मुस्लिम समाजात हा सण आणि पूर्ण महिना पवित्र मानला जातो. समाजातील लहानथोर महिनाभर उपवास करतात. त्याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. काल त्या उपवासाचा समारोप ईद साजरी करून पार पडला. एरवी ईदचा उत्साह धार्मिक स्थळांवर प्रफुल्लीत जमावाच्या गर्दीने लक्षात येतो. काल मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदचा सण साधेपणाने साजरा केला.सरकारने सुचवलेल्या नियमांचे कसोशीने पालन केले. घराबाहेर पडणे टाळले. घरच्या घरी नमाजपठण केले. अनेक कुटुंबांनी खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचा मोहही टाळला.

आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय अनेक सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांनी घेतला आहे. उत्सवमूर्ती आकाराने छोट्याच ठेवण्याचेही काही मंडळांचा प्रयत्न राहील. नेतृत्वाची ओळख दिवसेंदिवस बदलत आहे. ज्याच्यामागे समाज चालतो तो नेता, ही कल्पना कालबाह्य ठरत आहे. समाजासोबत जो चालतो तो नेता ही व्याख्या रूढ होत आहे. वैयक्तिक हित बाजूला ठेवून सार्वत्रिक हिताची भूमिका बहुतेक समाजघटक कटाक्षपूर्वक घेऊ लागले आहेत. काल ईदसारख्या सणात सुद्धा मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी हीच भूमिका घेतली असावी. सामाजिक सुधारणा या कायद्याच्या बडग्याने होत नसतात. त्यासाठी समाजाच्या जाणीवा प्रगल्भ व विकसित होण्याची गरज असते. ही जाणीव प्रखर होती म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेले कायदे घाईने अमलात आणणे टाळले.

पहिली पत्नी घरात असताना दुसरे लग्न सुद्धा गाजावाजाने थाटामाटात करण्याची प्रथा विसाव्या शतकाच्या सातव्या दशकात सुद्धा होती. द्विभार्या प्रतिबंधक कायदा केव्हाच अमलात आला होता. तरीही त्या कायद्याचे विडम्बन समाजाने पाव शतक तरी पाहिले. आज मात्र पहिली पत्नी हयात असता दुसर्‍या लग्नाची कल्पनाही कोणी करू शकत नाही. ढीगभर कायदे असूनही आर्थिक गुन्हे मात्र दिवसेंदिवस का वाढत आहेत? बँकांना कोट्यवधींचा चुना लावून अनेक मल्या आणि चोक्सी किंवा ललित आणि निरव देशातुन राजरोसपणे पलायन कसे करू शकतात?

जगाच्या नकाशावर ठिपक्यासारख्या आकाराच्या एखाद्या देशात दडी मारतात व साळसूदपणे चैनीत जीवन कसे घालवतात? अनेक कायद्यांचा पिंजरा अशा लुटारूंना आळा घालू शकत नाही. ट्रोलभैरवांची फौज ज्यांना सतत धर्मांध ठरवते त्या समाजाने काल दाखवलेली सामाजिक जागृती अत्यंत कौतुकास्पद आहे. याचे श्रेय समाजातील काही इमाम, मौलवी आदी धर्मगुरूंना द्यावेच लागेल पण सर्व समाजाची सामाजिक जाणीव खूप प्रगल्भ होत असल्यामुळे हे श्रेय मुख्यत्वे त्या मुस्लिम बांधवांनाच द्यावे लागेल. धार्मिक चालीरीती योग्य पद्धतीने कशा पार पाडता येतील यासाठी योग्य मार्गदर्शन, करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वातावरणाची भयानकता आणि समाजातील लहानथोरांचे सामंजस्य याचे असे मनोहारी दर्शन घडवणारा सण म्हणून कालची ईद आदर्श ठरावी.

Deshdoot
www.deshdoot.com