Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजनशक्ती केवढी महान !

जनशक्ती केवढी महान !

सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि जनता यांनी मनावर घेतले व एकजुटीने आणि परस्पर समंजस्याने प्रयत्न केले तर भयानक वेगाच्या चक्रीवादळामुळे होणार्‍या नुकसानीला आळा घालता येतो; अशी कौतुकास्पद कर्तबगारी ओडिशा राज्याने करून दाखवली आहे. अ‍ॅम्फान चक्रीवादळ नुकतेच ओडिशाला धडकून होते. या भयानक नैसर्गिक आपत्तीशी ओडिशा राज्यातील जनतेने व कारभार्‍यांनी एकत्रितपणे तोंड दिले. त्यामुळे या भयंकर आपत्तीत एकही मृत्यू झाला नाही, असे ओडिशा राज्याच्या विशेष मदत आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे. या आपत्ती व्यवस्थापनात पहिल्यांदाच 4300 पेक्षा जास्त महिला बचत गट सहभागी झाले होते.

ओडिशा कोरोनाशीदेखील लढत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवताना सामाजिक अंतर राखण्याचे आव्हान होते. आपत्तीच्या वेळी वापरली जाणारी निवारागृहे करोना क्वॉरंटाइन सेंटर म्हणूनही वापरली जात होती. त्यामुळे किमान दोन लाख वादळग्रस्तांसाठी तात्पुरती निवारागृहे उपलब्ध करून देण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेसमोर होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागणार होती. अ‍ॅम्फान चक्रीवादळाने दिशा बदलल्याची अफवाही समाजमाध्यमांवर पसरली होती. या सगळ्या आव्हानांशी यंत्रणेतील विविध विभागांनी समंजस्याने आणि परस्परसंवादाने यशस्वी मात केली आहे. ओडिशाला 1999 साली ‘फनी ’ चक्रीवादळाने झोडपले होते. त्या आपत्तीत 10 हजारांपेक्षा जास्त लोक बळी गेले होते. यंदा वादळ तीव्र असूनही मनुष्यहानी टळली. त्यावरून आपत्तीशी लढताना संघटित भावनेची उपयुक्तता सिद्ध होते. ओडिशा सातत्याने चक्रीवादळाशी सामना करत असते तर महाराष्ट्र राज्य सध्या कोरोनाशी लढत आहे.

- Advertisement -

लढण्याचे मनोबल हा दोन्ही राज्यातील आपत्तीप्रसंगी समान धागा आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. ती पूर्वपदावर आणणे हे सरकारपुढचे मुख्य आव्हान आहे. ते पेलताना केंद्र सरकार आणि राज्यपाल यांचे कितपत सहकार्य मिळेल, याबद्दल काहीशी साशंकता जाणवत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध सरकार हळूहळू सैल करत आहे. अनेक उद्योग, बाजारपेठा अलीकडेच सुरु झाल्या आहेत. देशांतर्गत उड्डाणासाठी मुंबई विमानतळ खुले होत आहे. लोकांना ठरावीक वेळेत घराबाहेर पडायला मुभा देण्यात आली आहे. लोक मात्र नेहेमीप्रमाणे सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेत आहेत का? निर्बंध सैल होताच लोक प्रचंड संख्येने घराबाहेर पडत आहेत. दुकानांमध्ये आणि वेगवेगळ्या बाजारात गर्दी करत आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे.

काही लोक मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत नागरिकांच्या हालचालींवर निर्बध कायम आहेत. तरीही अनेक उत्साही लोक रात्री उशिरापर्यंत शतपावली करताना आढळतात. सतत दोन महिने लॉकडाऊनमुळे बंदिवास अनुभवलेल्या जनतेला काहीशी मोकळी हवा अनुभवण्याची उत्सुकता अस्वाभाविक तरी कशी म्हणावी? कोरोनाचे संकट टळलेले नाही, याचा विसर पडला का? अशी शंका यावी असेच लोकांचे वर्तन का असावे? कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी ही परिस्थिती कारणीभूत ठरू शकते याचे भान जनतेने राखावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा करत आहेत. त्यांनी कालही जनतेशी संवाद साधला. राज्य सरकारने निर्बंध सैल का करायचे ठरवले, तेही जनतेला समजावून सांगितले. लोकांनी एकदम गर्दी केली आणि निर्बंध पाळले नाही तर पुन्हा एकदा सगळे व्यवहार बंद करावे लागतील, असेही बजावले. त्यातील मर्म लोकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

सरकार निर्बंध सैल करत असेल तर आपली किमान काळजी लोकांनी घेणे अपेक्षित आहे. कोरोना संदर्भातील बेपर्वाई वाढली तर काय होईल, याची जाणीव कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकड्याने करून दिली आहे. सरकारी यंत्रणा, तंत्रज्ञ, सामाजिक संस्था आणि जनता यांच्या एकत्रित वर्तनाचे फायदे ओडिशाने अनुभवले आहेत. ‘जनशक्ती केवढी महान; तो जो आणील संघटनो; तो स्वर्गावरीही लावील निशाण; आपल्या कार्ये ’ असे लोकशक्तीचे वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले आहे. त्यातील मर्म सगळ्यांनीच लक्षात घेतले तर कोरोनावर विजय मिळवणे कदाचीत सोपे होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या