आरोग्यसेवेत अवेळी अस्वस्थता !
Featured

आरोग्यसेवेत अवेळी अस्वस्थता !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोना साथीचा सर्वात जास्त ताण आरोग्यसेवांवर आहे व तो दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच तो ताण आणखी आणखी वाढत आहे. डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक जीवाची बाजी लावून रुग्णांवर उपचार करत आहेत. त्याबद्दल समाज कृतज्ञताही व्यक्त करत असतो. लोकांनी घराच्या दरवाजात उभे राहून थाळ्या, घंटानाद केला. काही ठिकाणी कोरोना रुग्णालयातील जबाबदारी पार पाडून घरी जाणार्‍या परिचारिकांवर लोकांनी फुलांचा वर्षावसुद्धा केला. तथापि आरोग्य यंत्रणेत सारे काही आलबेल नाही; अशी शंका यावी, अशा घटना घडतच आहेत.

राज्यात वैद्यकीय शिक्षण देणारी 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांना आणि त्यांच्या रुग्णालयांना सरकारने खास कोविड रुग्णालये म्हणून नमूद केले आहे. ही महाविद्यालये आणि त्यांच्या रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स बेकायदा गैरहजर राहत आहेत व काही डॉक्टर्स फक्त हजेरीपुरतेच रुग्णालयाकडे फिरकतात, असेही आढळले आहे. अशा गैरहजर डॉक्टर व आरोग्य सेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाच्या तपासणीबाबत वेगवेगळ्या नियमावली जाहीर होत आहेत. संशयित रुग्णांना घरी कधी पाठवायचे, रुग्णालयात कधी दाखल करायचे आदी अनेक तपशिलांबद्दल संभ्रमावस्था आहे. आरोग्यसेवेत 21 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते.

खासगी डॉक्टरांसंदर्भातही शासनाची भूमिका वारंवार का बदलली जावी, ही शंका बोलली जाते. शासकीय यंत्रणेच्या विविध विभागांत लाखो कर्मचारी काम करतात. त्यातील हजारो कर्मचारी याच प्रकारे गैरहजर राहत असतील का? शासकीय नोकरी म्हणजे काम न करता पगाराची हमी असे चेष्टेने म्हटले जाते. त्यामुळे विनापरवानगी गैरहजर राहणे, हा आपला हक्कच आहे, असाही शासकीय कर्मचार्‍यांचा समज असेल का? तथापि सध्याचा काळ आरोग्यदृष्ट्या संवेदनशील आहे. कोरोनाच्या काळात निदान डॉक्टरांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष कसे करावे? आरोग्यसेवेत अचानक अस्वस्थता का निर्माण झाली असावी? यामागे राजकारण नसेलच असे ठामपणे म्हणता येणार नाही. सध्या राजकीय कुरघोड्यांना सुमार राहिलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आलटून पालटून जात्याची आणि सुपाची भूमिका बजावत असतात. एकमेकांवर कुरघोड्या करण्याशिवाय राजकीय पक्षांना दुसरे कामच नसावे का? अशी शंका जनतेला यावी अशीच सध्याची परिस्थिती आहे. कोरोनाची साथ, पायपीट करत आपापल्या गावी परत गेलेले परप्रांतीय कामगार हेदेखील कुरघोड्यांचे मुद्दे बनवले गेले. या अस्वस्थतेमागे राजकारणाशिवाय वेगळे काय असणार? सरकारने आरोग्यसेवेतील अस्वस्थतेमागच्या कारणांचा जरूर शोध घ्यावा.

कारणे काहीही असली तरी सध्याच्या काळात आरोग्यसेवेतील अस्वस्थता असणे सरकारला आणि पर्यायाने समाजाला परवडणार नाही. कारण कोरोना साथीचा मुकाबला करण्याची मुख्य भिस्त आरोग्य यंत्रणेवरच आहे. जनतेनेही यातून बोध घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्यसेवेत काम करतात तेसुद्धा माणसेच आहेत. माणसाचे गुणदोष त्यांच्यातही असणारच ! सामाजिक आरोग्याची भिस्त सरकारी आरोग्य यंत्रणेवर असली तरी सरकारने घातलेले निर्बंध पाळणे, आरोग्यपूर्ण छोट्या-मोठ्या चांगल्या सवयी लावून घेणे ही जनतेचीदेखील जबाबदारी आहे, हे लोकांनीसुद्धा लक्षात घ्यायला नको का? व्यावसायिक जबाबदारी सरकारी असोत की, खासगी. ती योग्य रीतीने पार पाडण्याचे काम अखेर संबंधित माणसांनाच करावे लागणार आहे, ही खूणगाठ सर्व संबंधितांनी आपापल्या मनाशी बांधणे बरे.

Deshdoot
www.deshdoot.com