शिक्षकांच्या गुणवत्तेचे काय ?
Featured

शिक्षकांच्या गुणवत्तेचे काय ?

Balvant Gaikwad

कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन..यामुळे शिक्षणसंस्थाही बंद, अशी परिस्थिती या देशाने प्रथमच अनुभवली आहे. शिक्षणक्षेत्रासमोर त्यामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. लॉकडाऊननंतर सुरु होणार्‍या शाळांचे अभ्यासक्रम कसे असतील? शाळांचे शैक्षणिक सत्र नेहेमीच्या सुट्ट्यांपेक्षा दीड-दोन महिने जास्त बंद राहिले आहे. त्यानंतर ते सुरु झाले तर पूर्ण सत्राचा अभ्यासक्रम कसा पुरा होणार? काही संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. पण अशा पद्धतीने दिले जाणारे शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याची शक्यता कमीच! असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

विद्यापीठांनी आपापल्या स्तरावर या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ’ आगामी शैक्षणिक सत्रापासून किमान 20 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवणे बंधनकारक असेल ’ अशी बातमी झळकली आहे. या बदलासाठी प्राध्यापकांनी स्वतःला तयार करावे ’ असे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील यांनी केले आहे. करोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीला आणि शिकवण्याच्या साचेबद्ध पद्धतीला धक्के बसत आहेत. या दोन्ही मुद्द्यांवर सरकारने विचार करावा आणि परंपरिकतेची आणि नवतेची सांगड घालावी असे आग्रही मत शिक्षणक्षेत्रातील तज्ञ वारंवार व्यक्त करत आहेत.

करोनामुळे त्याचा विचार प्राधान्याने करणे सरकारलाही भाग पडेल. तथापि शिकवण्याची पद्धत कोणतीही असो, शिक्षक हाच त्याचा कणा आहे. आणि दुर्दैवाने चांगले शिक्षक तयार करणे अनेक कारणांनी दुर्लक्षित राहिले आहे. त्यातील प्रमुख कारण सर्वांना माहीतच आहे. सरकारी क्षेत्रात नोकरी कोणत्याही संदर्भातील असो, त्याठिकाणी आवश्यक गुणवत्तेपेक्षा कोणत्या वेगळ्या गुणवत्तेची आवश्यकता सर्वाधिक असते हे सर्वाना माहित असलेले अध्याहृत सत्य आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना कसे शिकवतात आणि विद्यार्थी ते कसे शिकतात ही महत्वाची बाब मात्र दुय्यम ठरते. शिक्षणाची पदवी प्राप्त झाली म्हणजे शिकवण्याचा अधिकार नोकरीपुरता प्राप्त होतो. पण कसे शिकवले जाते? शाळेत अनेक शिक्षक असतात. पण सगळेच शिक्षक विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी करून घेण्यात यशस्वी का ठरत नाहीत? प्रयोगशील शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी चांगला संवाद असतो. त्यांनी शिकवलेला कोणताही विषय विद्यार्थ्यांना चांगला समजतो.

तथापि शाळांमध्ये अशा शिक्षकांचे प्रमाण किती असेल याचा आढावा कटाक्षाने घेतला जाणे जरूर आहे. शिक्षकांची पात्रता ठरवण्याच्या परीक्षेला बर्‍याच शिक्षकांचा विरोध का असावा? गेली काही वर्षे या प्रकारच्या बिनशेंडाबुडखी गोंधळामुळे शिक्षणाचा खेळखन्डोबा झाला आहे. त्यामुळेच उत्तरपत्रिका गायब होणे, निकालपत्रे देताना गोंधळ होणे, पेपर फुटणे, निकाल उशिरा लागणे, चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप अशा अनेक गोंधळाना सर्वाना सामोरे जावे लागत आहे. करोनामुळे या गोंधळावर आपसूकच पडदा पडला. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलले गेले. अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे ’ झाकली मूठ सव्वा लाखाची’ राहिली म्हणून अनेक शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असेल!

ऑनलाईन पद्धतीने शिकवणे हळूहळू रूढ होत जाईल असे शिक्षणतज्ज्ञाना वाटते. तसे होणार असेल तर शिक्षकांनाही त्या बदलाला सामोरे जावे लागेल. शिक्षणक्षेत्रातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संबंधित घटकांना योग्य दिशा द्यावी लागेल. तज्ज्ञांच्या मदतीने सरकार ही जबाबदारी पार पडेल अशी जनतेची अपेक्षा आहे. तथापि यासाठी सरकारी शिक्षणखात्याकडून सुद्धा द्रष्टेपणाची गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com