डोळस व्यवहार्य दृष्टिकोन हवा !
Featured

डोळस व्यवहार्य दृष्टिकोन हवा !

Balvant Gaikwad

प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ठराविक जाडीच्या प्लास्टिक वापरावर सरकारने बंदी आणली. पण प्लास्टिकचा वापर थांबलेला नाही. थांबण्याची पुरेशी लक्षणेही दिसत नाही. हा अतिरेक माणसांच्या आणि जनावरांच्याही जीवावर उठला आहे.

नुकतीच एका गाभण गायीची हकीगत समजली. गायीचे पोट अचानक दुखायला लागले. जनावरांच्या डॉक्टरांनी तिला तपासले. तातडीने शस्त्रक्रिया केली आणि त्या गायीच्या पोटातून 50 किलोपेक्षा अधिक प्लास्टिक निघाले. प्लास्टिकबरोबर खिळे, काचांचे तुकडे, लोखंड असे बरेच काही सापडले. जनावरांच्या पोटात प्लास्टिक सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधी असे अनेकवेळा घडले आहे. काही जनावरांच्या ते जीवावर देखील बेतले आहे.

एका समुद्रकिनार्‍यावर देवमासा मृतावस्थेत सापडला. त्याच्या पोटात 29 किलो पिशव्यांचे प्लास्टिक गुंडाळ्याच्या स्वरूपात आढळले. ही घटना स्पेनमधील! समुद्रातील 80% कचरा हा प्लास्टिकपासून बनला आहे. अलिकडच्या काही वर्षांत, 700 सागरी प्रजाती या प्लास्टिक प्रदूषणामुळे प्रभावित झाल्या आहेत. असा या विषयाचे अभ्यासक डॉ विष्णूराधन यांचा अंदाज आहे. त्यांचे निष्कर्ष काही वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहेत. रोज निर्माण होणार्‍या कचर्‍यामध्ये 25 हजार टनांपेक्षा जास्त प्लस्टिक कचर्‍याचा समावेश आहे.

एकूण कचर्‍यापैकी सुमारे निम्म्या कचर्‍यावर पुनर्वापराची प्रक्रिया होते. उरलेल्या कचर्‍याचा पुनर्वापर अद्याप होत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगात 2030 पर्यंत 600 दशलक्ष टनाहून जास्त प्लास्टिक कचरा जमा होऊ लागेल. प्लास्टिक सर्वस्वी नष्ट होत नाही. त्याचे मातीत विघटन होत नाही. ते पाण्यात विरघळत नाही. आगीत जळत नाही. म्हणून त्याला विनोदाने अजरामर म्हंटले जाते. हजारो वर्षे ते नष्ट न होता पडूनच राहाते. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. प्लास्टिकचा वापर झाल्यावर ते कसेही आणि कुठेही फेकून दिले जाते. त्यामुळे ही समस्या अधिकच तीव्र बनत आहे. तथापि या समस्येकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहणे व्यवहार्य ठरणार नाही. एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्‍या आणि विशिष्ट जाडीच्या प्लॅस्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. पण अनेक कारणांमुळे त्या बंदीची कसोशीने अंमलबजावणी होत नाही. होणे शक्यही नाही. साहजिकच वापर बंदी हा इलाज प्रभावी ठरला नाही. म्हणून त्या नियमाचा फेरविचार आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर हरतर्‍हेने सोयीचा ठरतो. म्हणून तो वापर सर्वस्वी बंद होण्याची शक्यता नाही.

म्हणून बंदीऐवजी कचर्‍यात जाणार्‍या प्लास्टिकचा पुनर्वापर होईल असे उपाय सुचवले जावेत. जगात इतरत्र सुद्धा प्रयोग होत आहेत. त्याची माहिती सुद्धा संकलित केली जावी. काही देशात कचर्‍यातील प्लास्टीकचा वापर रस्ते बांधणीच्या कामात केला जातो. आपल्याकडे फेकल्या गेलेल्या प्लास्टिकच्या कचर्‍याचा पुनर्वापर करून गादी, तक्के, लोड आदी बैठकीचे सामान बनवण्याचा यशस्वी प्रयोग आनंदवनात केला जातो.

त्यासाठी शेजारच्या नागपूर, वर्धा जिल्ह्यातूनसुद्धा प्लास्टिक कचरा त्यांना पुरवला जातो. अशा प्रयोगांचे प्रत्यक्ष निरीक्षण व परीक्षण करून त्या माहितीचे संकलन सरकारने अद्याप का केलेले नाही? सरकारी कामकाजाच्या पद्धतीत अशा प्रयोगांची माहिती एकत्रित करण्याबाबत आढळणारी उदासीनता प्लास्टिक कचर्‍याच्या समस्यपक्षा कमी चिंताजनक नाही. तो आळस झटकला गेला तर प्लास्टिक कचर्‍याच्या गंभीर समस्येची उकल होणे अश्यक्य नाही.

Deshdoot
www.deshdoot.com