Friday, April 26, 2024
Homeनगरपोलिसाची उपअधीक्षकांकडून धुलाई; अदखलपात्र गुन्हाची नोंद

पोलिसाची उपअधीक्षकांकडून धुलाई; अदखलपात्र गुन्हाची नोंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानी नेमणुकीस असलेल्या एका पोलीस शिपायाला नगर ग्रामीणच्या पोलीस उपअधिक्षकांनी व त्यांच्या सोबतच्या सहकार्‍यांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार पोलीस मुख्यालयाच्या गेट शेजारी मंगळवारी (दि. 03) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक याविषयी कोणती भूमिका घेतात याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पोलीस शिपाई सागर भास्कर तावरे हे मंगळवारी रात्री वरिष्ठांच्या परवानगीने मुख्यालयातील स्वत:च्या निवासस्थानी गेले. तावरे यांनी घरी जेवण केल्यानंतर मुख्यालयातील गेटजवळ असलेल्या एका टायर दुकानासमोर सहकार्‍यांसह गप्पा मारीत थांबले होते. साडेदहाच्या सुमारास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे सहकार्‍यांसह शासकीय वाहनाने पोलीस मुख्यालयाकडे जात होते. तावरे उभा असलेल्या ठिकाणी उपाअधीक्षक पाटील हे सहकार्‍यांसह उतरले व त्यांनी तावरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

पोलीस कर्मचारी असल्याचे कळाले तरी पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले, तुला मारहाण केली तर बाकी लोक पळून जातील. पाटील यांनी मारहाण केल्याने तावरे हे दुचाकीवरून खाली पडले. ते जखमी झालेत. पाटील यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍याने तावरे यांचे हात पकडून मारहाण करण्यासाठी मदत केली. तावरे यांच्या सोबत असलेल्या सय्यद नावाच्या मित्राने यांना सांगितले की, तावरे हे पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानी आहे. त्यावर पाटील म्हणाले, तो कुठे असला तरी माझे कोणीच काही करू शकत नाही. पाटील यांनी तावरे यांना शिवीगाळ केले असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत नेहमीच कठोर निर्णय घेत असतात. आतापर्यंत गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे. तावरे यांना झालेली मारहाण धक्कादायक आहे. वरिष्ठांच्या आदेशानेच तावरे यांनी पोलिसांत तक्रार दिली असल्याचे समजते. याबाबत आता पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या