नगर : शिवसेेनेची मते फुटणार का? दिवसभर चर्चा
Featured

नगर : शिवसेेनेची मते फुटणार का? दिवसभर चर्चा

Sarvmat Digital

गुरूवारी मतमोजणी : जिल्हा नियोजनसाठी 100 टक्के मतदान

अहमदनगर (प्रतिनिधी)-  गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या पर्यायाने शहराच्या राजकारणात चवीने चर्चिला गेलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 24 रोजी सर्व म्हणजे 67 महापालिका नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. शंभर टक्के मतदान झाल्यामुळे यात शिवसेनेच्या मतांमध्ये फाटाफूट होते का, याकडे लक्ष लागले असून गुरूवारी दि. 26 ला मतमोजणी झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये तीन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. महापालिका क्षेत्रातून या पाचपैकी तीन जागा होत्या. त्यामध्ये भाजपच्या आशाताई कराळे अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी आज मतदान झाले. त्यातील सर्वसाधारण जागेसाठी अनिल शिंदे आणि ज्ञानेश्वर उर्फ अमोल येवले या दोन शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येच लढत झाली. दुसर्‍या जागेवर विनित पाऊलबुधे (राष्ट्रवादी) आणि सुवर्णा जाधव (शिवसेना) यांच्यात लढत झाली.

राज्यात एकत्र आलेले शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नगरमध्ये मात्र एकत्र राहू शकले नाहीत. सर्वसाधारण जागेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बसपचे नगरसेवक अनिल शिंदे यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून आले, तर नागरिकांचा मागासवर्ग या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत झाली. विशेष म्हणजे या दोन्ही जागेवर राज्यात या तीन पक्षाच्या विरोधात असलेली भाजप येथे मात्र राष्ट्रवादी, काँग्रेससोबत दिसून आली. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेला एकाकी पाडण्याचे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप यांचे धोरण जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीतही कायम राहिल्याचे चित्र होते.

सकाळी साडेअकरापर्यंत 67 पैकी तीस नगरसेवकांनी व त्यानंतर दुपारी एकपर्यंत 56 नगरसेवकांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास असिफ सुलतान यांनी शेवटचे मतदान केले. दुपारी शिवसेनेचे नगरसेवक स्वतंत्रपणे मतदानाला येत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक एकत्र मतदानासाठी येत होते. एकाचवेळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये हे नगरसेवक तेथे आल्याने एकूण चित्र काय असेल, याचा अंदाज व त्यानुसार चर्चा सुरू झाली. महापालिकेत 68 नगरसेवक असून, त्यापैकी सारिका भूतकर यांचे पद रद्द झाल्याने 67 एवढेच मतदार होते.

शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांसमोर उभारल्याने आणि शिंदे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससह भाजपचा पाठिंबा मिळविल्याच्या चर्चेने शिवसेनेचे उपनेते अऩिल राठोड यांनी काल सायंकाळी उशीरा शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीलाही काही नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समजते. त्यांनी सर्व नगरसेवकांना येवले यांना मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते मतदान केंद्रावर सकाळपासून उपस्थित होते. मात्र भाजप शहर जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहरप्रमुख मात्र केंद्राकडे फिरकले नाहीत.

‘बाप्पा, कामच झालं ना !’
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांना बाप्पा या नावाने ओळखले जाते. त्यांची उमेदवारी म्हणजे उपनेते राठोड यांना शह असल्याचेही मानले जाते. मतदान सुरू असताना एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यामध्ये ‘बाप्पा, कामच झालं ना, लाईनच बदलली ना’ असे एक गाणे असून, दिवसभर याच व्हिडिओची चर्चा होती.

Deshdoot
www.deshdoot.com