जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी घेतला कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत मुख्य सचिवांकडून आढावा

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी घेतला कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत मुख्य सचिवांकडून आढावा

मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय महेता यांनी आज सर्व विभागीय आयुक्त्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. कोरोना संदर्भात नागरिकांनी आवश्यक ती घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही आणि उपाययोजनांबाबतचा आढावा घेण्यात आला.

मंत्रालयात यावेळी झालेल्या आढावा बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त संजीव उन्हाळे आदी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता चीनसह 12 देशातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा 14 दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. त्यातील कोणाला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल करुन नमूने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले जातात. त्यानंतर नमुना निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशाला डिस्चार्ज दिला जातो, असे त्यांनी सांगितले.

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी होत असून आवश्कता असल्यास अधिकचे मनुष्यबळ तेथे पुरविण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी महानगरपालिका व संबंधीत विभागांना दिले. नागरिकांनी मास्क ऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ठ अंतरावर संवाद साधावा, खोकतांना अथवा शिकंताना तोंडावर रुमाल धरण्यात यावा. अशा सूचनांचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण करावे, जेणेकरुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण न पसरता खबरदारी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

जिल्हा रुग्णालयांमध्ये विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले असून त्या ठिकाणी पुरेशा साधन सामग्री उपलब्ध असल्याबाबत त्यांनी आश्वास्त केले. ज्या जिल्ह्यांमध्ये बंदरे आहेत तेथे परदेशातून येणारे जहाजांवरील प्रवाशांची देखील तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत व कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये. याकरिता सामुहिक, समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. असे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात यावे अशा देखील सूचना मा.मुख्य सचिव यांनी दिले. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, विविध धर्माचे प्रमुख प्रतिनिधी इत्यादींचे सहकार्य घेण्याचे सूचित केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com