शिवसेनेतील दुही कायम; आज ‘जिल्हा नियोजन’साठी मतदान
Featured

शिवसेनेतील दुही कायम; आज ‘जिल्हा नियोजन’साठी मतदान

Sarvmat Digital

येवले, जाधव शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, पण व्हीप नाही

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजनच्या महापालिका क्षेत्रातील दोन जागांसाठी आज होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षातील दुही थांबविता येणे जवळपास अशक्य झाल्याने आता फक्त किती नगरसेवक पक्षविरोधात मतदान करतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर येवले आणि सुवर्णा जाधव हे दोन उमेदवार शिवसेनेचे अधिकृत असल्याचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले. गुप्त मतदान असल्याने व्हीप देखील काढण्यात येणार नसल्याचे ते म्हणाले.

जिल्हा नियोजन समीतीच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दोन जागांसाठी मंगळवार दि. 24 रोजी मतदान होत आहे. या दोन्ही जागा महापालिका क्षेत्रातील असल्याने तेथे मतदान देखील महापालिकेचे नगरसेवकच करणार आहेत. 68 पैकी शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाले असल्याने उद्याच्या निवडणुकीसाठी 67 मतदार आहेत.

यातील सर्वसाधारण जागेसाठी अनिल शिंदे आणि ज्ञानेश्वर येवले या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्येच लढत होत आहे. दुसर्‍या नागरिकांचा मागास प्रवर्गात राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुधे आणि शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात लढत होत आहे. महापालिकेत प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना(23), राष्ट्रवादी (18), भाजप (14), काँग्रेस (5), बसप (4) असे बलाबल आहे.

विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे आणि उपनेते अनिल राठोड यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार येवले की शिंदे याबाबत संभ्रम होता. मात्र शहरप्रमुख सातपुते यांनी येवले अधिकृत असल्याचे जाहीर केल्याने शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे मानले जाते. शिंदे यांना या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, बसप यांची साथ मिळण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांचे पारडे जड आहे.

शिवाय त्यांना मानणारे काही शिवसेनेचे नगरसेवकही त्यांना मतदान देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सायंकाळी उशीरापर्यंत त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांसमवेत बैठका सुरू होत्या. त्यांना साथ देणार्‍या नगरसेवकांची संख्या नेमकी किती हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. तसेच राष्ट्रवादीच्या मतांच्या बदल्यात शिवसेनेच्या या नगरसेवकांनी दुसर्‍या जागेवर लढत असलेले पाऊलबुधे यांना मतदान करावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचा आहे. त्यासाठीही शिंदे प्रयत्नशील आहेत. तसे झाल्यास शिवसेनेतील फूट अधिकृतरित्या समोर येईल.

शिंदे यांनी ही निवडणूक लढवू नये, यासाठी शिवसेनेतून अद्यापपर्यंत काहीही प्रयत्न झाले नसल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीत काही नगरसेवकांनी विरोधात काम केल्याचा ठपका राठोड समर्थकांकडून ठेवला जात आहे. त्यात शिंदे यांच्यासह इतर नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे हे सर्वच नगरसेवक प्रचंड अस्वस्थ आणि नाराज आहेत.

त्यातूनच पक्षातील दोन नगरसेवकांनी एकमेकांविरूद्ध दंड थोपटण्याची वेळ आल्याचेही बोलले जाते. विशेष म्हणजे शिंदे यांची समजूत घालण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडूनही फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची शिंदे यांच्या कृतीला मूकसंमती असल्याचे मानले जाते.

महाविकास आघाडीचा धर्म
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे तोच धर्म खालपर्यंत पाळणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीमधील शिंदे यांची उमेदवारी त्याचाच एक भाग असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगितले जाते. मात्र यात भाजप सोबत कशी, या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही.

Deshdoot
www.deshdoot.com