जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू

सोसायटी प्रतिनिधींच्या ठरावासाठी गावागावांत मोर्चेबांधणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या अर्थकारणासह राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाची समजल्या जाणार्‍या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. संचालक निवडीसाठी सहकारी सोसायट्यांच्यावतीने मतदान करणार्‍या प्रतिनिधींची नावे पाठविण्यात येणार्‍या ठरावाची प्रक्रिया आज बुधवारपासून सुरू होत आहे. त्यासोबतच सभासद संस्थांच्या मतदारयाद्या तयार करण्यात येणार आहेत.
संस्था प्रतिनिधी निवडीचे ठराव करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2020 पर्यंत पूर्ण करायची आहे. सभासद संस्थांची प्राथमिक मतदार यादी 6 मे 2020 पर्यंत निश्‍चित केली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याहीक्षणी बँकेची निवडणूक जाहीर होणार आहे.

यां नावाने होऊ शकतो ठराव..
सभासद झाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीनंतर संस्था मतदानास पात्र होत असल्याने बँकेच्या दि. 6 मार्च 2017 किंवा त्यापूर्वी सभासद झालेल्या संस्थांना प्रतिनिधींचे ठराव पाठविण्यास पात्र असतील. संस्था थकबाकीत असतील तर अशा संस्थेच्या संचालकाऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याच्या नावानेही ठराव करता येणार आहे. अन्य काही अटी आहेत. दरम्यान, सभासद संस्थांच्या निवडणूक मतदान प्रतिनिधींची महत्त्वाची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाल्याने आपल्या समर्थक व्यक्तीची निवड होण्यासाठी जिल्हाभरातील दिग्गज राजकीय नेतेमंडळींचा कस लागणार आहे. दरम्यान, राज्यातील बदललेल्या सत्तेचा व राजकीय समीकरणांचा प्रभाव यंदाच्या बँकेच्या निवडणुकीवर राहणार असल्याची चर्चा आहे.

ठरावासाठी अनेक ठिकाणी रस्सीखेच
जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची कामधेनू मानली जाते. अकोलेतून आ. किरण लहामटे, माजीमंत्री मधुकरराव पिचड, संगमनेरला काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिर्डी-राहात्यातून भाजपाचे ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पा., कोपरगावला आ. अशोक काळे, माजीमंत्री शंकरराव कोल्हे, श्रीरामपूरला भानुदास मुरकुटे, करण ससाणे आणि अविनाश आदिक गट, राहुरीला आ. प्राजक्त तनपुरे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, नेवाशाला यशवंतराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तसेच पारनेरला आ. नीलेश लंके, विजय औटी, श्रीगोंद्याला आ. बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, कर्जत-जामखेडला आ. रोहित पवार, प्रा. राम शिंदे आणि शेवगाव-पाथर्डीत आ. मोनिका राजळे व चंद्रशेखर घुले यांच्या समर्थकांनी प्रतिनिधीसाठी आपल्याच नावाचा ठराव व्हावा यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

16 जानेवारीपर्यंत ठरावांची मुदत
संस्था प्रतिनिधी निवड ठराव करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्ह्यात सुमारे 1400 सोसायट्या आहेत. त्यामुळे या माध्यमातून 1400 सदस्यांच्या नावाने ठराव होणार असल्याने या निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे ठराव 16 जानेवारीपर्यंत पाठविणे अनिवार्य आहे. त्यानंतर ही यादी नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविली जाईल. त्यावर ते निर्णय घेतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com