फरकाच्या रकमेसाठी शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन
Featured

फरकाच्या रकमेसाठी शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

Sarvmat Digital

15 दिवसांत रक्कम वर्ग न केल्यास कारखान्यावर आर. आर. सी. कारवाईचे संकेत; प्रादेशिक कार्यालयाच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

अहमदनगर (प्रतिनीधी) – मागील सन 2018-19 हंगामातील ऊसदराच्या रितसर प्रतिटन 221 रुपये फरकाच्या रकमेच्या मागणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, अहमदनगर येथे सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले. प्रसाद शुगरने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रतिटन 2321 रुपये व कार्यक्षेत्राबाहेरील श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना फक्त प्रतिटन 2100 रुपये ऊसदर देऊन भेदभाव केल्यामुळे ऊस उत्पादकांनी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. भेदभाव न करता समान ऊसदर देणे कायद्याने बंधनकारक असल्याचे व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका क्रमांक 4162/98 मध्ये दिनांक 02/08/2010 रोजी तसा निकाल दिलेला असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

यावेळी प्रादेशिक उपसंचालक राजेंद्रकुमार जोशी, प्रथम विशेष लेखा परीक्षक राजेंद्र देशमुख उपस्थित होते. प्रादेशिक साखर कार्यालयाने प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाला प्रतिनिधी उपस्थित का नाही? याबाबत विचारणा केली. मात्र कारखान्याच्या व्यवस्थापनाने प्रतिनिधी न पाठवता ई-मेल करून मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे फरकाची रक्कम देण्यास तयार असल्याचे लेखी कळविले. मात्र आंदोलक शेतकर्‍यांनी ऊसदर फरकाची रक्कम कधी वर्ग होणार हे कळल्याशिवाय कार्यालयातून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.

प्रसाद शुगरचे व्यवस्थापन शेतकर्‍यांना वेठीस धरून प्रादेशिक साखर कार्यालय व साखर आयुक्त कार्यालयाचीही दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी यावेळी केला. बेकायदेशीर भूमिका घेणार्‍या कारखान्याच्या व्यवस्थापनावर तातडीने आर. आर. सी. कारवाई करून व्याजासह फरकाची रक्कम वर्ग करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक साखर कार्यालयाने मध्यस्थी करून प्रसाद शुगरने 15 दिवसांच्या आत फरकाची रक्कम अदा करावी अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करून शेतकर्‍यांची अडकलेली फरकाची रक्कम व्याजासह वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना दिल्यामुळे त्यावर विश्‍वास ठेवून शेतकर्‍यांनी अडीच तास चाललेले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऊस उत्पादकांच्या ठिय्या आंदोलनास शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष बच्चू मोढवे, योगेश उंडे, नेवासा तालुका संपर्कप्रमुख भास्करराव तुवर, ऊस उत्पादक शेतकरी संजय उंडे, अशोकचे माजी संचालक मारुतराव पटारे, साहेबराव पटारे, मधुकर कोकणे, संजीव उंडे, नागनाथ लोंढे, हरेन पटारे, विलास पटारे, नानासाहेब गोरे, शिवाजी उंडे, नामदेव गायके, आप्पासाहेब पटारे, राजेंद्र राजुळे, दत्तात्रय उंडे, नानासाहेब पटारे, विजय बोरुडे, कुंडलिक पटारे, खंडेराव सलालकर, सकाहरी शेजुळ, बाळासाहेब गांगुर्डे, इंद्रभान दाभाडे, गीताराम दाभाडे, वैभव काकडे, अशोक शेटे, दिलीप उंडे, बाळासाहेब शेळके, निलेश उंडे, राजेंद्र गायके, दगडू उंडे, गोरक्ष गोरे, गोविंद खंडागळे, दिगंबर खंडागळे, विठ्ठल माळी आदी कारेगाव, मातापूर, टाकळीभान, भेर्डापूर, भोकर, खोकर आदी गावांतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com