धुळे : शिरपूर दोन महिला करोना पॉझिटिव्ह
Featured

धुळे : शिरपूर दोन महिला करोना पॉझिटिव्ह

Balvant Gaikwad

 जिल्ह्यातील  बाधीतांची संख्या 134 

शिरपूर शहरात वाल्मिकी नगर व अंबिका नगर येथे पुन्हा दोन महिला पॉझिटिव्ह आल्याने चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शिरपूर शहरातील रूग्ण संख्या 17 व ग्रामीण भागात 8 असे एकूण 25 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 134 इतकी झाली आहे. त्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 66 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरातील अंबिका नगर येथील बाधीत रूग्णाच्या संपर्कातील 38 वर्षीय पत्नी व वाल्मिकी नगर येथील 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 60 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरात अंबिका नगर येथे गुरुवारी दि. 28 मे रोजी सहा तर शहरातीलच पारधीपुरा येथे एक जण असे एकूण सात जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. शिरपूरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेे आता शहरात 17 व ग्रामीण भागात 8 असे एकूण 25 रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी तीन जण मृत्युमुखी पडले असून काही बरे देखील झाले आहेत.

आतापर्यंत पाटीलवाडा, भूपेश नगर, काझी नगर, अंबिकानगर, खालचे गाव बालाजी मंदीराजवळ, मोहल्ला, मारवाडी गल्ली या भागात रुग्ण आढळले असून तेव्हा पासून हा परिसर सील करण्यात आला आहेत.

शिरपूर येथे पाच दिवस जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. कोरोना हटाव, शिरपूर बचाव मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील प्रमुख सर्व पक्षीय नागरीकांच्या विनंतीनुसार जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. संपूर्ण शिरपूर शहरात दि. 29 मे ते दि.2 जून या पाच दिवसांच्या काळात शहरातील हॉस्पिटल व त्यांच्याशी संलग्न औषधांची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील.

लॉकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दिले आहेत.

शहरात सील करण्यात आलेल्या भागातील नागरीकांनी घराबाहेर पडू नये. या भागातील सर्व व्यवहार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. शहरातील कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

सर्वेक्षण पथकांना खरी माहिती सांगावी. लक्षणे आढळल्यास त्वरीत कॉटेज हॉस्पिटल शिरपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com