देवळालीत डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण
Featured

देवळालीत डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण

Sarvmat Digital

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – डेंग्यूसदृश आजाराच्या तापाने देवळाली प्रवरातील अवघा शेटेवाडी परिसर फणफणला आहे. प्रत्येक कुटुंबातील दोन-तीन व्यक्ती या आजाराने बाधीत झाले आहेत. मात्र, याकडे लक्ष द्यायला आरोग्य विभागाला वेळ नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेटेवाडी परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने सुरूवातीला तीन-चार दिवस अंगावर बारीक ताप येतो व डोके दुखते. त्यानंतर रुग्णाला प्रचंड ताप येतो. या आजाराने शेटेवाडी येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिक देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील स्थानिक दवाखाने तसेच श्रीरामपूर, राहुरी व नगर येथे दाखल झाले आहेत.

घरातील एकाला उपचार करून घरी आणले की, घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडत आहे. काहींचे तर संपूर्ण कुटुंबच आजारी पडले आहे. तर काही ठिकाणी एक-एक व्यक्ती आजारी आहे. रुग्णांनी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. या आजारावरील उपचार मोठा खर्चीक असल्याने नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

एका रुग्णाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपयांपासून पन्नास, साठ हजार रुपये खर्च येत आहे. आरोग्य विभागाने दखल घेऊन रुग्णांची तपासणी करून लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

मध्यंतरीच्या सततच्या पावसा नंतर शेटेवाडीसह परिसरात मोठ्या प्रमाणात डास निर्माण झाले. डास निर्मूलनासाठी वेळेत फवारणी होणे गरजेचे होते. परंतु ही फवारणी वेळेवर झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी कडेकडेने फवारणी करून निघून गेले. वाडीच्या आतमधील गल्ल्यांत थातूरमातूर फवारणी करून ते निघून गेले. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात डास झाले व त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला. डेंग्यूसदृश आजाराने वाडीवर थैमान घातले असताना येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी, बहेनजी किंवा तत्सम कोणीही नागरिकांना बघण्यास अद्यापपर्यंत आले नाही हे विशेष !

Deshdoot
www.deshdoot.com