Friday, April 26, 2024
Homeनगरश्री क्षेत्र देवगड येथे आज दत्तजयंती सोहळा

श्री क्षेत्र देवगड येथे आज दत्तजयंती सोहळा

जय्यत तयारी; सोहळा पाहण्यासाठी मोठ्या पडद्यांची व्यवस्था

देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे आज 11 डिसेंबर रोजी दत्तजयंती निमित्त सायंकाळी सहा वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा होणार असून सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

- Advertisement -

श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व साधुसंत, राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी व लाखो भक्तांच्या उपस्थित विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. देवगड येथे दत्तमंदिर प्रांगणात दत्तजयंती सोहळा होणार आहे. सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी मोठ्या पडद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रा काळात सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्याची तयारी केली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या वतीने नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, गंगापूर, पैठण, औरंगाबाद या आगारांतून अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

भास्करगिरी महाराज, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे व यात्रा समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. एसटी पार्किंग, मोटारसायकल पार्किंग, चारचाकी पार्किंग व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.

काही खासगी जागा असणार्‍या शेतकर्‍यांना पार्किंग नियमावली सांगून पार्किंगचे नियोजन करण्यास सांगितले आहे. श्री क्षेत्र देवगडचा दत्तजयंती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. या सप्ताह काळात राज्य भरातून लाखो भाविक हजेरी लावतात. विशेषतः दत्तजयंतीच्या दिवशी लाखो भाविक दर्शन घेतात. 5 डिसेंबरपासून दत्त जयंती महोत्सव सुरु आहे. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सोहळ्याची सांगता उद्या गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी महंत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

सकाळी क्षेत्रप्रदक्षिणा
समर्थ किसनगिरी बाबांच्या प्रतिमा व पादुका असलेल्या पालखीची मिरवणूक महंत भास्करगिरी महाराज व हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवगड येथे सकाळी 7 वाजता क्षेत्र प्रदक्षिणा करणार आहे. दरम्यान काल क्षेत्र प्रदक्षिणेसाठी पालखी बनवण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या