शरद पवारांनी एखादं पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनाही लिहावं – फडणवीस

शरद पवारांनी एखादं पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनाही लिहावं – फडणवीस

सार्वमत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावं. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसंच दुकानदारांना, फुटपाथवर बसणार्‍यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावं अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. त्यांच्याकडून केवळ राजकारण सुरु आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. परंतु राज्य सरकारकडून करोनाचा योग्यरित्या सामना केला जात नाही. अनेकांना लोकांना उपचार मिळत नाहीत. एकीकडे ही अवस्था आहे तर दुसरीकडे शेतमाल पडून आहे. त्याची व्यवस्थादेखील राज्य सरकारने केलेली नाही. शेतकर्‍यांना बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकर्‍यावर संकट आलं आहे, सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत. केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही त्यांना रेशन पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच धान्य मिळत नाही, रुग्णांना अ‍ॅम्बुलन्सही मिळत नाही. त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. आपण एक डॅशबोर्ड बनवून रुग्णालयातील जागा सांगू शकतो. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल. आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहोत. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु. त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू. मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली. आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहोत, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको. आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्या, असंही फडणवीस म्हणाले.

केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर करावे
केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर केलं पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच करोना व्हायरसमुळे उभं राहिलेल्या संकटचा मुकाबला सरकार पाहिजे तसा करत नाही असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com